सोलापूर – राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत लाडक्या बहीणींना दरमहा एक हजार पाचशे रूपये देण्यात येते. मात्र या योजनेअंतर्गत लाभ घेणार्या महिलांना दोन महिन्याच्या मुदतीमध्ये ई केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सध्या पात्र लाभार्थी महिलांना ई-केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना करावी लागत आहे . पहिल्या दिवसापासूनच सर्व्हर डाऊन आणि ओटीपी मिळण्यातील तांत्रिक अडचणींमुळे मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहीणी वैतागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ‘लाडक्या बहिणीं’ मध्ये नाराजी आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी करणे अनिवार्य असल्याने लाडक्या बहिणी ई-
केवायसीसाठी सीएससी सेंटर्स, सेतू केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र, ई-केवायसीसाठी असलेले पोर्टल चालत नसल्याने ओटीपी येण्यास अडथळे येत आहेत. याशिवाय सतत एरर, योजनेसाठी पात्र नाहीत, संकेतस्थळावर खूप लोड आहे, असे संदेश येत असल्याने ई-केवायसी होत नाही. एका ई-केवायसीसाठी दोन ते तीन दिवस वेळ लागत असल्याने लाडक्या बहिणी वैतागून गेल्या आहेत.
वेबसाइट अपडेशन आणि देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येते . सरकारी पोर्टल्सना नेहमी तांत्रिक अडचण येतात, तर ई-कॉमर्स साइटस मात्र सुरळीत चालतात. त्यामुळे योजनांवर होणाऱ्या खर्चापेक्षा संकेतस्थळाच्या मजबुतीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे .
पती-वडील नसलेल्यांचे काय?
ई-केवायसी करताना केवळ तांत्रिक अडचणीच नाही तर इतरही अनेक समस्या लाडक्या बहिणींसाठी डोकेदुखी ठरत आहेत. ज्यांचे वडील किंवा पती नाहीत अशा महिलांनी काय करावे? अशा प्रश्नामुळे महिलांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे.
ई केवायसी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांची ई केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक दिवसांपासून सर्वर बंद आहे. शिवाय ओटीपी येताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे दिवसभर महिला थांबून चालली आहेत.
राम गोसावी, केंद्रचालक, महा ई सेवा केंद्र, मंद्रुप