देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सिंचन घोटाळ्याचा आरोप ज्यांच्यावर केला होता त्यांनाच ते सध्या बरोबर घेऊन फिरत आहेत.सिंचन घोटाळा व राज्य सहकारी बँक घोटाळा आरोप पंतप्रधानांनी नेमका कशासाठी व कोणासाठी केला होता याचा खुलासा पंतप्रधान मोदींनी केला पाहिजे,असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केला.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगरमध्ये आले असता शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
ते म्हणाले की,भाजपा सरकारने ईडी ,सीबीआय सारख्या महत्वाच्या यंत्रणांचा वापर केला असून त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आहेत.ईडीच्या कारवायांमुळेच सध्या देशातील 2 राज्यांचे मुख्यमंत्री जेल मध्ये आहेत.सत्तेचा गैरवापर भाजपाने कसा केला हे सांगण्याची गरज राहिलेली नाही.
भाजपाच्या 400 पार या नारेबाजी बाबत बोलतांना शरद पवार म्हणाले की हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या 50 टक्क्यांहून अधिक जागा जिंकून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्यात ज्या प्रमाणे महाविकास आघाडी स्थापन केली त्याच धर्तीवर संपूर्ण देशात इंडी आघाडी स्थापन केली असून एकत्र येऊन लोकसभा निवडणुका लढल्या जात आहेत.सर्वप्रथम लोकांना स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न असून इतर बाबींचा नंतर विचार करू असे ते म्हणाले.राज्यात महाविकास आघाडीला तसेच देशात इंडी आघाडीला अनुकूल वातावरण आहे.
धनगर आरक्षणा बाबत बोलतांना पवार म्हणाले की,राज्यात धनगर समाजाला आरक्षण देऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती मध्ये जाहीर केले होते.त्यानंतर ते मुख्यमंत्री व आता उप मुख्यमंत्री झाले आहेत.मात्र धनगर समाजाला आरक्षण व सवलती देणचा शब्द पाळला गेला नाही.या समाजाला उच्च न्यायालय व सर्वोच्य न्यायालयात देखील न्याय मिळाला नसल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केला.
शुक्रवारी राज्यात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदार संघांमध्ये मतदान पार पडले.मात्र अगदी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर मध्ये ही मतदारांची उदासीनता दिसून आली आहे.कदाचित उन्हामुळे मतदानाची संख्या कमी दिसत असेल असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बारामती मध्ये प्रचाराची शेवटची सभा स्वत: शरद पवारच घेतात असा इतिहास आहे.मात्र यावेळी अजित पवार यांनी सदरचे मैदान अगोदरच आरक्षित करून ठेवल्याने पवार गटाची थोडी अडचण झाली आहे.गरज भासली तर मैदान बदलू.मैदाना ने काही फरक पडत नाही तर विचार महत्वाचे असतात असे शरद पवार म्हणाले.
आरक्षणा बाबत बोलतांना शरद पवार म्हणाले की,आरक्षणाच्या विषयामुळे समाजातील अनेक घटक दुरावले जातात व कटुता निर्माण होते.त्यामुळे नेहमीच या विषयात कटुता येऊ नये म्हणून मी बोलत नाही. समाजामध्ये सामंजस्य कसे टिकून राहील याकडे आपण पाहातो.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवारांवर टीका केली होती.त्याबाबत विचारले असता त्यांच्या टीकेला महत्व द्यायचे नसते.त्यांचे पराक्रम मला माहिती आहेत,असे सांगून ते आता कोणत्या पक्षात आहेत,अशी विचारणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनाच केली.
सध्या राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस व पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चार्याची समस्या गंभीर बनली आहे.सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.प्रशासनाने व यंत्रणांनी नागरिकांना तातडीने सुविधा पुरविल्या नाहीत तर आम्ही रत्स्यावर उतरू आसा इशारा पवार यांनी यावेळी दिला.