बार्शी – स्मार्ट मीटर बसविणे व वाढीव वीजबिलांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भात आंदोलनकर्ते अमोल डोंगरे व प्रमोद कसबे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांना समर्थन देत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महावितरण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) बार्शी शहर कार्यालय येथे देण्यात आलेल्या निवेदनात स्मार्ट मीटरमुळे वाढणारी वीजबिलांची समस्या तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होणारा आर्थिक ताण याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली. शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत ठेंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना बार्शी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्षा सौ. शीतल मांजरे, शिवसेना विधानसभा प्रमुख अविनाश शिंदे, बारिकराव शिंदे तसेच अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलांच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजी असून त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
























