सियाचेन ही काही साधीसुधी भूमी नसून भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वर्णन केले. ज्याप्रमाणे दिल्ली ही भारताची राष्ट्रीय राजधानी आहे, मुंबई ही आर्थिक राजधानी आणि आणि बंगळुरू ही तंत्रज्ञानाची राजधानी आहे, त्याचप्रमाणे सियाचेन ही शौर्य, जिद्द आणि दृढनिश्चयाची राजधानी आहे, असेही ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी आज (22 एप्रिल) जगातील सर्वांत उंचीवर असलेली युद्धभूमी सियाचेनला भेट दिली आणि तेथील सुरक्षा स्थितीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करून आढावा घेतला. अतिशय प्रतिकूल हवामान आणि कठीण प्रदेशात तैनात असलेल्या जवानांशी त्यांनी संवाद साधला. संरक्षणमंत्र्यांच्यासमवेत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे; जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, नॉर्दन कमांड लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार आणि जनरल ऑफिसर कमांडिंग, 14 कॉर्प्स लेफ्टनंट जनरल रशीम बाली देखील होते.
या भागाची हवाई पाहणी केल्यानंतर संरक्षणमंत्री 15,100 फूट उंचीवर आघाडीच्या चौकीवर उतरले, तिथे त्यांना सियाचेन शिखरावरील परिचालन सज्जतेबद्दल आणि सध्याच्या सुरक्षा स्थितीबद्दल माहिती देण्यात आली. त्यांनी प्रत्यक्ष स्थळी तैनात असलेल्या कमांडर्ससोबत परिचालन आव्हानांशी संबंधित पैलूंवर चर्चा केली.
अत्यंत कठीण परिस्थितीत दुर्दम्य साहस आणि दृढनिश्चयाच्या जोरावर आपल्या मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी मार्गक्रमण करणाऱ्या जवानांचे त्यांनी कौतुक केले. राष्ट्र नेहमीच सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांचे ऋणी राहील कारण त्यांच्या त्यागामुळेच प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटते. आपण एक शांततापूर्ण आयुष्य जगत आहोत, कारण आपल्याला याची खात्री आहे की आपले शूर सैनिक सीमेवर जागता पहारा देत आहेत. येणाऱ्या काळात जेव्हा राष्ट्राच्या सुरक्षेचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा हिमाच्छादित शिखरांच्या सियाचेन मधील साहसी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या आपल्या जवानांचे स्मरण मोठ्या अभिमानाने केले जाईल. भावी पिढ्यांसाठी ते कायमच प्रेरणादायी ठरतील, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
देशाने अलीकडेच ऑपरेशन मेघदूतच्या यशाचा 40 वा वर्धापन दिन नुकताच साजरा केला. भारतीय सैन्याने 13 एप्रिल, 1984, रोजी पार पाडलेले ऑपरेशन लष्कराच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय आहे, असे ते म्हणाले. ऑपरेशन मेघदूतचे यश हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून संरक्षण मंत्र्यांनी सियाचीन युद्ध स्मारक येथे जाऊन पुष्पचक्र अर्पण केले.
राजनाथ सिंह यांनी 24 मार्च 2024 रोजी लेह येथे भेट दिली होती आणि तेथील जवानांबरोबर होळी साजरी केली होती. त्यांचा सियाचेनचा दौरा पूर्वनियोजित होता , मात्र खराब हवामानामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. लेह वरून संरक्षण मंत्र्यांनी सियाचेन मधील जवानांशी संवाद साधला होता आणि आपण जगातील सर्वात उंचीवर असलेल्या युद्धभूमीला लवकर भेट देणार असल्याचे आणि त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगितले होते. अशाप्रकारे, आजच्या भेटीने राजनाथ सिंह यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपल्या आश्वासनाची पूर्तता केली.