छोटी बहीण छतावरुन पडली! भावानं आई-वडिलांना सांगितलं; पोलीस पाटलांना संशय; पोलीस येताच गूढ उकललं
संशयावरुन भावानं सख्ख्या बहिणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरठी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सोनुली गावात २४ डिसेंबरच्या दुपारी ही घटना घडली. बहीण भावात क्षुल्लक कारणामुळे वाद झाला. तो विकोपाला गेला. त्यानंतर भावानं बहिणीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) असं आरोपीचं नाव आहे. आशिषनं त्याची बहीण अश्विनीची हत्या केली. पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली.
गोपीचंद बावनकुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या कुटुंबासोबत सोनुली गावात वास्तव्यास आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. गोपीचंद आणि त्यांची पत्नी मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. ज्या दिवशी हत्या घडली तेव्हा गोपीचंद कार्यक्रमासाठी कन्हानला गेले होते. तर त्यांची पत्नी कामासाठी साकोलीला गेली होती. आशिष आणि त्याची बहीण अश्विनी घरी होते. दुपारी २ च्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. अश्विनीच्या कथित प्रेम प्रकरणामुळे दोघांचं भांडण झालं.
सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. आशिषनं अश्विनीच्या नाक आणि तोंडावर ठोसे मारले. त्यानंतर त्यानं बहिणीचा गळा दाबला. अश्विनीनं जीव सोडला. बहिणीच्या हत्येनंतर तो फरार झाला. थंड डोक्यानं गावात भटकत होता. गुन्हा कसा लपवायचा असा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. अश्विनीचा छतावरुन पडून मृत्यू झाल्याचं त्यानं आई वडिलांना सांगितलं.
२४ डिसेंबरच्या संध्याकाळी पोलीस पाटलांनी घटनेची माहिती वरठी पोलिसांना दिला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी अश्विनीच्या मृत्यूचा तपास सुरू केला. अश्विनीच्या गळ्याजवळच्या खुणा पाहून त्यांनी तपासाचा वेग वाढवला. आशिषची चौकशी सुरू केली. शवविच्छेदन अहवालातून अश्विनीच्या हत्येचं कारण समोर येईल, असं आशिषला वाटलं. त्यामुळे त्यानं हत्येची कबुली दिली.
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आशिषला ताब्यात घेण्यात आलं आहे. अश्विनी नागपुरात तिच्या मावशीकडे राहून शिक्षण घ्यायची. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं ती नागपुरात राहून व्यावसायिक शिक्षण घेत होती. बारावीनंतर तिनं भंडाऱ्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सहामाही परीक्षा देऊन ती घरी आली होती.