सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अजित मौर्याला फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली होती. विमा योजना आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याला दोन बायका, ९ मुलं आणि ६ गर्लफ्रेण्ड असल्याची माहिती आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अजित मौर्यला लखनऊच्या सरोजिनीनगर येथील हॉटेलमधून अटक केली आहे. अजित मौर्य पत्नीसोबत हॉटेलमध्ये जेवण करत होता आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात जाण्याचा प्लान बनवत होता, पण त्याचा प्लान पूर्ण होऊ शकला नाही कराण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली.
सोशल मीडिया साइट्सवर रील बनवणाऱ्या मौर्यला २ बायका, ९ मुलं आणि ६ गर्लफ्रेंड आहेत. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो गुन्हेगारीच्या जगात आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मौर्यवर नऊ गुन्हे दाखल आहेत. धर्मेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने मौर्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांना त्याच्या गुन्ह्यांची माहिती मिळाली. पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली काही लोकांनी आपली ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला होता.
आधी मौर्य हा मुंबईत बनावट प्लास्टर ऑफ पॅरिसचे छत बनवण्याचे काम करत होता. काम मिळणं बंद झाल्यावर त्याचा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला. पोलिसांनी सांगितले की, २००० मध्ये त्याने मुंबईतील ४० वर्षीय संगीतासोबत लग्न केले आणि तिला सात मुलं आहेत. २०१० मध्ये त्याची नोकरी गेली आणि ते गोंडा येथील त्याच्या गावी परतले, परंतु येथेही त्याला बेरोजगारीचा सामना करावा लागला.
मौर्यविरुद्ध चोरी आणि अतिक्रमणाचा पहिला गुन्हा २०१६ मध्ये गोंडा येथे दाखल झाला होता. दोन वर्षांनंतर तो ३० वर्षीय सुशीलाच्या संपर्कात आला आणि त्याने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘त्याने बनावट नोटा आणि पॉन्झीसारख्या योजनांचा प्रसार सुरू केला. या दोघांनी लवकरच इतर काही लोकांसोबत एक संघटना स्थापन केली. २०१९ मध्ये मौर्यने सुशीलाशी लग्न केले. जिच्याकडून त्याला ३ मुलं आहेत.
२०१९ मध्ये सुशीलासोबत लग्न झाल्यानंतर मौर्यचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. दोघांनी मिळून गुन्हेगारीच्या जगात पाऊल ठेवलं. पैसे दुप्पट करून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू केली.
तपासादरम्यान, मौर्यने दोन घरे बांधल्याचे पोलिसांना कळालं. एका घरात संगीता राहते आणि दुसरे सुशीला आणि तिच्या मुलांसाठी. त्याच्या दोन्ही पत्नी या घरांमध्ये आरामात सर्व सुखसोयींचा उपभोग घेत आहेत. इतकेच नाही तर लोकांकडून लुटलेलं सामानही या दोघींमध्ये समान प्रमाणात विभागले जात होते. मात्र, आता अखेर अजित मौर्यला अटक करण्यात आली आहे.