सोलापूर जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात तापमान ४५ अंशा पर्यंत पोहचते. आताच एप्रिल अखेर शहरातील तापमान ४३ अंश इतके झाले आहे. त्यामुळे उष्मा घातामुळे लोकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.
दरम्यान, प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता केली जात आहे. तापमानाचा पारा वाढू लागल्याने जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी ग्रामीण भागातच झाला. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्मघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यात ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रावर स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहेत.
आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षासाठी स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. त्यात प्रत्येक कक्षात रुग्णांसाठीबेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन या सह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामां बाबत आरोग्य विभाग जन जागरुकताही करीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले.