इचलकरंजी, १८ नोव्हेंबर (हिं.स.) :
राज्यातील वस्त्रोद्योगाचा विकास साधण्यासाठी इचलकरंजीला सोलर सिटी बनवून वीज बिलमुक्त करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वीज बिलमुक्तीमुळे उत्पादन खर्चात घट होऊन वस्त्रोद्योगाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या ‘विजय निर्धार सभे’त बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केले आहे आणि आता घरगुती वीज बिलात ३०% कपात करणार आहोत. याशिवाय इचलकरंजीतील पाणी समस्या सोडवून आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी मी पुढाकार घेईन.
फडणवीस यांनी भाजपच्या भगव्या झेंड्याचा उल्लेख करत महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले की, लोकांनी खरे साधू आणि संधीसाधू ओळखले पाहिजेत. आता राहुल आवाडे आणि सुरेश हाळवणकर यांच्या एकत्र येण्याने मताधिक्याचा नवा विक्रम होईल.
राहुल आवताडे यांनी वस्त्रोद्योगाला मिळालेल्या ९२ कोटींच्या वीज सवलतीचा आणि विकासासाठी सव्वाशे कोटींच्या निधीचा उल्लेख केला. त्यांनी इचलकरंजीच्या पुढील सुळकूड योजनेसाठी सरकारकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
आमदार प्रकाश आवाडे यांनी यंत्रमाग योजनांचा लाभ घेतल्याबद्दल विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोधक फक्त शिव्या देण्यात गुंतले आहेत, पण आम्ही मर्यादा पाळतो.
सभेवेळी मराठा समाजाने राहुल आवाडे यांना पाठिंबा देण्याचे पत्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ दाखवून महाविकास आघाडीवर टीका करण्यात आली. फडणवीस म्हणाले की, यांना रोखण्यासाठी धर्मयुद्ध लढावे लागेल; अन्यथा पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही.
सभेचा समारोप करताना फडणवीस म्हणाले की, पावसात भिजून नाही, तर मतांचा पाऊस पडून निवडून यावे लागते. या सभेत जनतेचा आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला विजयाची खात्री वाटते. यांच्याच मतांचा पाऊस पडणार असे ते म्हणाले.