मुंबई – ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहे, तिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी. तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
150 दिवसांच्या कामाचा आढावा, अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या पदोन्नती, अहिल्याभवन उभारण्यासाठी जागा निश्चितीकरण, बालसंगोपन योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. बैठकीस विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, सहसचिव वि.रा.ठाकूर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पुण्यात अहिल्याभवन अथवा महिलांचे वसतीगृह करण्यासंदर्भात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीच्या माध्यमातून उभारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या. तसेच, बालसंगोपण योजनेसंदर्भात आढावा त्यांनी यावेळी घेतला.
ज्या अंगणवाडीमध्ये विद्यार्थी जास्त आहेत मात्र, मदतनीस, सेविकांची संख्या कमी आहे. आणि जिथे विद्यार्थी कमी आहेत अशा अंगणवाड्यांमध्ये सेविकांची पुनर्नियुक्ती करावी. नवीन अंगणवाड्यांची आवश्यकता कुठे आहे यासदंर्भात सर्वेक्षण करून, त्याप्रमाणे त्या प्रदेशात अंगणवाडी, मदतनीस व सेविका यांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच पर्यवेक्षिका, जिल्हा पर्यवेक्षिका यांना ग्रामविकास विभागातून महिला व बालविकास विभागात वर्ग करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.




















