तभा फ्लॅश न्यूज/ छत्रपती संभाजीनगर : धर्मासाठी सर्वांना संघटित व्हावे लागेल. संघटनामुळे अधर्म संपतो, हे आर्य चाणक्यांनी धनानंदला संपवून दाखवून दिले. धर्म टिकला तरच आपण टिकणार आहोत. देव, देश, मंदिर आणि धर्म यांवर होणाऱ्या आघातांविषयी हिंदूंनी जागृत व्हावे. सर्व मंदिर विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरावरील आघात थांबतील. वेळीच जागे व्हा, तरच जागेवर राहाल, अन्यथा ही जागा सोडून जावे लागेल, असे प्रतिपादन श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज यांनी केले. ते अधिवेशनाच्या प्रथम सत्रात बोलत होते.
श्री काशी विश्वनाथ बाबा संस्थान, दत्त मंदिर, बीड बायपास, श्री पावन गणेश मंदिर, दिवाण, देवडी, सोमठाणा येथील श्री रेणुकामाता मंदिर, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन पार पडले. श्री काशी विश्वनाथ बाबा संस्थान, दत्त मंदिर, बीड बायपास येथे दि.२० जुलै रोजी पार पडलेल्या अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंदगिरीजी महाराज, पू. यशवंत शिवनगिरीकर महाराज, माजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिलीप देशमुख, हिंदु जनजागृतीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रल्हाद शिंदे यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रम्ह प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन श्री. रामेश्वर भुकन यांनी केले. उपस्थितांचे स्वागत सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश प्रल्हाद शिंदे यांनी केले तर अधिवेशनाची प्रस्तावना हिंदु जनजागृती समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक प्रशांत जुवेकर यांनी मांडली.
या अधिवेशनाला परभणी, नांदेड, जालना, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील विविध मंदिरांचे १८० हून अधिक विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. मंदिरांमध्ये चालू असलेल्या पाश्चात्य कुप्रथा थांबवा ! सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती अनेक मंदिरातील मूर्तींना नाताळच्या काळात सांताक्लोजचा वेष परिधान केला जातो. देवाचा केक कापून वाढदिवस साजरा करणे, मंदिरात दान दिलेल्या वस्तूंचा अयोग्य वापर, काही ठिकाणी देवस्थानांच्या गायी कसायांना विकणे यांसारख्या कुप्रथा घडत आहेत. तसेच वैयक्तिक मानापमानामुळे अनेक मंदिराकडे दुर्लक्ष करणे, यामुळे मंदिर संस्कृती आणि मंदिरे बदनाम होत आहे, यावर उपाय म्हणजे मंदिर विश्वस्तांनी मंदिर संस्कृती परंपरा प्रथा यांचे पालन हिंदु संस्कृती नुसार करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.
मंदिरे – धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवी ! सद्गुरू नंदकुमार जाधव
मंदिर हा हिंदु संस्कृतीचा वारसा आहे, तो जतन करणे महत्त्वाचे आहे. आपला धर्म, संस्कृती जीवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांमुळे झालेले आहे. मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मंदिरात येणाऱ्यांना धर्माचा अभ्यास नसतो. तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र झाली आहेत. त्यामुळे तेथील आध्यात्मिक शक्तीचा लाभ होत नाही. मंदिरांमधून धर्मशिक्षण दिले तर त्यांची श्रद्धा वाढून सशक्त राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल आणि ती राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देईल. मंदिरांतून संस्कारवर्ग घेणे, धर्मशास्त्र समजावून सांगणे हे कार्य नियमित व्हायला हवे. हिंदु समाजाची जन्म हिंदु ते कर्म हिंदु पर्यंत वाटचाल होण्यासाठी मंदिर अधिवेशन हे प्रभावी माध्यम आहे. म्हणून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे बनायला हवी, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी केले.
या वेळी निवृत्त सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी न्यास नोंदणी तसेच मंदिरांच्या अडचणीसंदर्भात तर सनातनचे संत पू . सुरेश कुलकर्णी यांनी तुळजाभवानी देवस्थानातील भ्रस्टाचाराविषयी दिलेल्या कायदेशीर लढ्याविषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात मंदिर विश्वस्तांना मंदिरांच्या जमिनीविषयी येणाऱ्या अडचणी याविषयी परिसंवाद आयोजित करण्यात आला. समारोपीय सत्रात मंदिर महासंघाच्या कार्याची पुढील दिशा कशी असावी? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. समारोपीय सत्रात महंत नारायण नंदगिरी महाराज, श्री. श्यामकुमार जैस्वाल, श्री. प्रमोद नरवाडे, कु. प्रतीक्षा कोरगावकर, कु. प्रियंका लोणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.