साओ पाऊलो १० ऑगस्ट : ब्राझीलच्या विन्हेडो प्रांतात ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळल्याची दुर्घटना शुक्रवारी (९ ऑगस्ट) दुपारी घडली. विमान कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसकडे जात होते. व्होपास लिन्हास एरिआज कंपनीचे एटीआर-७२ हे विमान दुपारी १.३० च्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विमानतळाशी संपर्क तुटला. थोड्याच वेळात विमान कोसळल्याची माहिती समोर आली.विमान कोसळल्यानंतरच्या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आग आणि धूर दिसत होता. ग्लोबोन्यूजने या दुर्घटनेचा व्हिडीओ जारी केला आहे,
ज्यात विमान रहिवासी भागाजवळ जंगलात कोसळताना दिसत आहे. विमानाचा काही भाग घरांवर कोसळला, ज्यामुळे दुर्घटना आणखी गंभीर बनली. स्थानिक अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने पथके पाठवून बचाव कार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.व्होपास एअरलाईनने जारी केलेल्या निवेदनात ५८ प्रवासी आणि चार क्रू सदस्य विमानात असल्याची पुष्टी केली आहे.
मात्र, दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.दक्षिण ब्राझीलमधील एका कार्यक्रमात ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांनी या विमान दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि अपघातात दगावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. या दुर्घटनेमुळे ब्राझीलमध्ये शोककळा पसरली आहे.अग्निशमन दल व बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जीवितहानी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.