‘शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती’, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटात सत्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ‘आम्ही बाहेर गेलो, तेव्हा ठाकरे यांनी मलाही फोन करून मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यांनी दिल्लीतही संपर्क साधून, यांना कशाला घेता, आम्हीच येतो असाही निरोप दिला होता. परंतु, त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती. ५० आमदार माझ्यासोबत होते. त्यामुळे फडणवीस यांच्या बोलण्यात वस्तुस्थिती आहे’, असा दावा शिंदे यांनी केला. ‘आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. मात्र त्या मी बोलू इच्छित नाही’, असा इशाराही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असताना ते वार्ताहरांशी बोलत होते. ‘उद्धव ठाकरे यांनी आम्हाला फोन केले होते. मात्र, मुख्यमंत्री बनण्यासाठी मी हा निर्णय घेतला नव्हता. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली गेली, त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊनच आम्ही गेलो होतो’, असे त्यांनी सांगितले. ‘विरोधकांकडे आता शिव्याशाप देणे आणि डिवचणे इतकेच काम उरले आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे काहीच उरणार नाही. आता सरकार बदललेले आहे, हे विरोधक मानायला तयार नाहीत’, असा टोला शिंदे यांनी लगावला. ‘जे काँग्रेसला करता आले नाही, ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत करून दाखविले. महायुतीनेही दोन वर्षांत अनेक कामे केली आहेत. त्यामुळे मतदार आमच्या कामाची पोचपावती देतील. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती काम करीत नाही. २४ तास आमचे काम सुरू असते. निवडणुका असो अथवा नसो, आम्ही काम करतो. घरात बसून किंवा फेसबुक लाइव्ह करून आम्ही काम करीत नाही,’ असेही ते म्हणाले.
‘महायुती एकत्रच’
नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे दिल्लीतूनच आदेश होते. परंतु, ती दिली न गेल्याने भुजबळ नाराज होते. भुजबळ हे आता तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरीची निवडणूक किती सोपी वाटते? अशी विचारणा केली असता एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ते आमच्या मंत्रिमंडळाचे सहकारी आहेत. तिकीटवाटप होईपर्यंत कार्यकर्त्यांची निवडणुकीला उभे राहण्याची इच्छा असते. परंतु, महायुतीने निर्णय घेतल्यानंतर आम्ही एक आहोत. एकदिलाने काम करणार आहोत’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
‘संजीव नाईकांशी चर्चा’
ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर संजीव नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘आमचे लोक संजीव नाईक यांना भेटले आहेत. त्यांच्याशी चर्चा झाली आहे. महायुतीचे काम ते करतील. महायुती देशाच्या विकासासाठी काम करीत आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी, तसेच या देशाला महासत्ता बनविण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढत आहोत. प्रत्येकाची इच्छा असते. महायुतीने निर्णय घेतल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतात, हा आमचा अनुभव आहे’.