ठाणे, 1 जुलै (हिं.स.) : विश्वास सामाजिक संस्था व श्रमिक मुक्ती संघटनेतर्फे नौपाड्यात आयोजित केलेल्या रानभाज्या व औषधी वनस्पतींच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात सुमारे ३५ हून अधिक भाज्यांची गुणधर्मे व वैशिष्ट्ये नागरिकांनी जाणून घेतली. या वेळी शिजविलेल्या काही भाज्यांचा नागरिकांनी आस्वादही घेतला.
ठाणेकरांना जंगलातील पौष्टिक रान भाज्या आणि वनौषधी वनस्पतींची माहिती असावी. तसेच शहरातील नागरिकांनाही रानभाज्यांची चव घेता यावी, यासाठी विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले, सदस्या वृषाली वाघुले-भोसले यांनी श्रमिक मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा इंदवी तुळपुळे यांच्या सहकार्याने सरस्वती शाळेच्या प्रांगणात रानभाज्या आणि औषधी वनस्पती महोत्सवाचे आयोजन केले होते.
टाकळा, शेवळी, भारंगी, मोदोडी, नारळी, कर्टोली, कोळी, कोरडू, कुडाफुले, खरशिंग शेंग, माठ, अळू, लोत, गोमटी, रान कारवा, भोपा, केना आदींसह सुमारे ३५ प्रकारच्या भाज्या महोत्सवात मांडलेल्या होत्या. तर वनौषधी व मधही उपलब्ध होते. सध्या रानभाज्यांची विक्री केली जात असून, साधारण महिनाभरानंतर फळभाजा उपलब्ध होतील, अशी माहिती तुळपुळे यांनी दिली.