बिग बॉस तमिळच्या सातव्या सीजनचा रिव्ह्यू करणारी अभिनेत्री वनिता विजयकुमारवर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात अभिनेत्री जखमी झाली असून तिचा चेहरा सूजला आहे. तिने फोटो शेअर करत घटनेची माहिती दिली आहे.
अभिनेत्री आणि बिग बॉस तमिळची माजी स्पर्धक वनिता विजयकुमारबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्तीने अभिनेत्रीवर हल्ला करून तिच्या चेहऱ्यावर वार केले. या घटनेनंतर वनिताचा संपूर्ण चेहरा सुजला आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून तिची अवस्था दाखवली आहे. वनिताची अवस्था पाहून अनेक चाहत्यांनीही अस्वस्थ होत चिंता व्यक्त केली आहे.
रविवारी वनिताने तिच्या एक्स अकाउंटवरुन चेहऱ्यावर झालेल्या जखमांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह तिने एक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, की ‘अतिशय धाडसाने मी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचे फोटो पोस्ट करत आहे. बिग बॉस ७ तमिळ हा टेलिव्हिजनवरील एक गेम शो आहे. मी अशाप्रकारच्या घटनेतून जाणं डिझर्व्ह करत नाही.’
पुढे तिने पोस्टमध्ये लिहिलंय, की ‘हा क्रूर हल्ला कोणी केला माहिती नाही. मी बिग बॉस तमिळ ७ चा रिव्ह्यू संपवला आणि रात्रीचं जेवण करुन माझ्या कारकडे निघाली होती. माझी कार माझ्या बहिणीच्या घराजवळ पार्क केली होती. तिथे अंधार होता. एक व्यक्ती कुठून तरी माझ्या जवळ आला आणि त्याने माझ्या चेहऱ्यावर जोरजोरात वार केले अणि तिथून तो पळून गेला. मला अतिशय वेदना होत होत्या. माझ्या चेहऱ्यातून रक्त वाहत होतं, मी जोरजोरात ओरडत होती. जवळपास १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली त्यावेळी माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. मी माझ्या बहिणीला खाली येण्यासाठी सांगितलं. तिने मला या घटनेची तक्रार पोलिसात करण्याचं सांगितलं, पण माझा या प्रक्रियेवरील विश्वासच उडाला असल्याचं’ अभिनेत्रीने म्हटलं.
अभिनेत्रीने केले इंडस्ट्रीतून ब्रेक घेण्याची घोषणा
मी माझ्यावर उपचार केले. मी त्या हल्लेखोराची ओळख पटवू शकले नाही. तो हसत हसत जाताना त्याचं हास्य माझ्या कानात आजही ऐकू येत असल्याचं अभिनेत्री म्हणाली. मी सध्या इंडस्ट्रीतून ब्रेक घेत आहे, कारण मी स्क्रिनवर दिसण्याच्या स्थितीत नाही.