सोलापूर : शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, नवोपक्रम आणि समाजाभिमुख कार्याचा आदर्श निर्माण करणारे न्यू इंग्लिश स्कूल, कुसूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील सहशिक्षक श्री. अब्दुलकादर ईसाक शेख यांना “ माजी प्राचार्य एन.आर.माने, निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार – २०२६” जाहीर झाला आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दि. ८ मे २०२६ रोजी सातारा येथे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. गेल्या १३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. शेख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण आणि परिणामकारक प्रयत्न केले आहेत. गणित व विज्ञान विषयात त्यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून एस.एस.सी. परीक्षेत सातत्याने १०० टक्के निकाल मिळवून दिला आहे. त्यांच्या अध्यापन पद्धतीत कृतीशीलता, संकल्पनांची सुस्पष्टता आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन यांचा प्रभावी संगम दिसून येतो.
नवोपक्रमी अध्यापनाची ओळख
श्री. शेख यांनी पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक परिणामकारक केले आहे. त्यांनी ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नसंच, डिजिटल चाचण्या, कृतीयुक्त अध्यापन साहित्य यांची निर्मिती करून विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गुणवत्ता उंचावली. कोविड-१९ काळात ‘रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन (ROSE)’ या प्रकल्पातून त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत अखंड शिक्षण पोहोचवले.
विद्यार्थ्यांच्या यशामागील प्रेरक शक्ती
त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एनएमएमएस शिष्यवृत्ती, इन्स्पायर अवार्ड, विज्ञान प्रदर्शन, बिल्डेथोन, यांसारख्या स्पर्धांमध्ये जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नवोपक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी त्यांनी “कोण होईल सहस्रपती” या प्रश्नमंजुषा उपक्रम नवरात्र उस्तव प्रसंगी सलग ४ वर्षे राबवली, ज्याला विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी
श्री. शेख यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती, ‘बेटी बचाओ’, ‘विद्यार्थी बँक’, वाचन संस्कार, जेष्ठ नागरिक आजी आजोबाशी पालक संवाद इत्यादी उपक्रम आणि यांसारख्या विविध कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य वितरण, दानपेटी उपक्रम यांद्वारे त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.
लेखनातून बौद्धिक योगदान
विज्ञान विषयावरील त्यांचे लेखन विविध नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण १४ पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. “शिक्षण संक्रमण” मासिकात प्रकाशित झालेला त्यांचा विद्यार्थी बँक हा लेखही विशेष चर्चेत आला होता. त्यांच्या लेखनातून विज्ञानाची आवड आणि विचारप्रवर्तक दृष्टी स्पष्ट होते.
सन्मानांची मालिका
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत विविध संस्थांनी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श गुरुवर्य पुरस्कार, आदर्श विज्ञान शिक्षक पुरस्कार, शिक्षकरत्न पुरस्कार, स्वयंम क्रांती सन्मान यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार देऊन गौरविले आहे.
शिक्षणातून घडवलेले मूल्याधिष्ठित समाजभान
श्री. शेख यांच्या कार्याचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि जीवन कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेत शिक्षणाची गुणवत्ता वाढली असून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत झाला आहे.
• १३ वर्षांचा समृद्ध अध्यापन अनुभव
• एसएससीमध्ये सातत्याने १००% निकाल
• डिजिटल शिक्षण व ऑनलाइन चाचण्यांची निर्मिती
• विद्यार्थ्यांसाठी YouTube शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती
• शाळा आणि विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक माहितीच्या ब्लॉगस्पॉटची निर्मिती
• एनएमएमएस व इन्स्पायर अवार्ड मध्ये विद्यार्थ्यांचे यश
• १४+ विज्ञान लेख प्रकाशित
• सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
त्यांच्या या उत्कृष्ट कार्याचा परामर्श घेऊन रयत शिक्षण संस्थेने त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे
त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. चंद्रकला भोरे, मुख्याध्यापक मारुती मडवळी, संजय जोशी, ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रय पवार, देवानंद महामुनी, सचिन पाटील, संतोष पाटील, संभाजी दीक्षित, वसंत ताकमोगे, रशीद शेख, माजी संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री सुरेश ढेरे, विभागीय अधिकारी मा.श्री.जगदाळे साहेब, विभागीय सहायक अधिकारी दिनेश दाभाडे, निकम साहेब, लाईफ मेंबर श्रीकृष्ण रेडे, राजेंद्र केदार, विद्यालयाचे मार्गदर्शक बाळप्पा नांगरे मामा, स्थानिक स्कूल समितीचे सदस्य सुनीलकुमार नांगरे, अशोक बिराजदार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धाराम विंचुरे, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ यांच्यासह पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी आणि पालकांनी अभिनंदन केले.























