गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरील सिरोंचा मतदान केंद्रावर आज, शुक्रवारी मतदानादरम्यान 3 ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने गोंधळ उडाला. अखेर अहेरी येथून 3 नवीन ईव्हीएम तातडीने हेलिकॉप्टरने आणण्यात आल्याने ही प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 55.79 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
गडचिरोली पोलिस दलाकडे 2 हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत. तथापि, निवडणूक काळात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मतदान पथके, ईव्हीएम आणि इतर साहित्य दुर्गम आणि अत्यंत दुर्गम भागात पोहोचवण्यासाठी आणखी सात हेलिकॉप्टर सज्ज आहेत. एकूण 9 हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी आणि ईव्हीएमची वाहतूक करण्यात आली आहे. दरम्यान, तांत्रिक बिघाड झाल्यास नक्षलग्रस्त आणि संवेदनशील भागात नवीन ईव्हीएम पोहोचवण्यासाठी पोलिस दलाने अहेरीमध्ये हेलिकॉप्टर सज्ज ठेवले होते. दरम्यान, 19 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता सिरोंचा येथील 3 मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये बिघाड झाला. त्यामुळे अखेर वरिष्ठांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदित्य जीवने यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी राखीव ठेवण्यात आलेले 3 ईव्हीएम हेलिकॉप्टरने अहेरीला पाठवले. त्यामुळे ही प्रक्रिया नव्याने सुरू झाली. सुरक्षेच्या कारणास्तव यंत्रणेकडून संवेदनशील भागात हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. यासोबतच ‘एअर ॲम्ब्युलन्स’ही सज्ज ठेवण्यात आली आहे.