पावसाळा ऋतु सुरु झाला आहे. त्यामुळे पर्जन्यवृष्टी होऊन पाणी साचणे, जलप्रवाह प्रवाहीत होणे, पिण्याच्या पाण्याचे जलस्रोतात वाहते पाणी येणे इ. असे अनेक प्रकारे जलजन्य आजारांचे प्रमाण वाढते. याशिवाय साचलेल्या पाण्यांमुळे डास, मच्छर आदी किटकांची पैदास वाढुनही अनेक आजारांचा प्रसार होतो. साहजिक आला पावसाळा आरोग्य सांभाळा असे म्हणण्याची वेळ येते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत साध्या सोप्या उपाययोजनांबाबत जागृती व्हावी याबद्दल या लेखात माहिती देण्यात आली आहे.
प्रशासकीय यंत्रणेची सज्जता
आरोग्य विभागांतर्गत कार्यरत मनुष्यबळ, साधन-सामुग्री तसेच औषध पुरवठा इ. ची उपलब्धता करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या मुख्यालयी राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दुर्गम तसेच डोंगरी भागात आवश्यकतेनुसार वाहन व्यवस्था उपलब्ध राहील याची खात्री करण्यात आली असून जोखीमग्रस्त भागात पुरेसे मनुष्यबळ उपलब्धता करण्यात आली.
दैनंदिन सर्व्हेक्षण
आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी राहुन आपल्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नियमित गृहभेटी देणे तसेच प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचे पंधरवडा सर्व्हेक्षण कॅलेंडर तयार करुन कॅलेंडरनुसार कार्यक्षेत्रात भेटींबाबत खातरजमा, नोंदी ठेवणे इ. वैद्यकिय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक ब आरोग्य सहाय्यक यांचेमार्फत करण्यात येत आहे.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण
जलजन्य आजाराच्या प्रभावी प्रतिबंधासाठी ज्या गावातील पाणी पुरवठा स्रोतांमध्ये समस्या आहेत त्या गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग तसेच पंचायत समिती व ग्रामपंचायती यांचेशी नियमित समन्वय ठेवून ग्रामपंचायती मार्फत स्रोता भोवतालची स्वच्छता आणि गळत्या, दुरुस्ती अशी कामे युद्ध पातळीवर करण्याबाबत उपाययोजना आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर विरंजक चुर्णाचा (ब्लिचींग पावडर) साठा पुरेशा प्रमाणात ठेवून क्लोरीनचे प्रमाण किमान ३३ टक्क्यापेक्षा कमी होवू नये या करीता ते साठविताना काळजी घेण्याबाबत सुचना केल्या आहेत.
पुरेसा औषध साठा
पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आवश्यक २१ औषधांची यादी तयार करुन ही सर्व औषधे उपकेंद्रा पासुन (साथरोग किट स्वरुपात) प्रा. आ. केंद्रापर्यंत पुरेश्या प्रमाणात उपलब्ध ठेवणे तसेच ज्या भागाचा पूर परिस्थितीमुळे संपर्क तुटण्याची शक्यता आहे, अशा भागातील आरोग्य संस्थामध्ये किमान ३ महिने पुरेल एवढा औषध पुरवठा पावसाळ्यापुर्वीच पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षाची स्थापना
पावसाळ्यात अनेकवेळा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. यादृष्टीने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर २४ x ७ साथरोग नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
शीघ्र प्रतिसाद पथक
जिल्ह्यात होणारे साथरोग उद्रेक वेळेत नियंत्रणात आणण्यासाठी ताबडतोब उपाय-योजना सुरु होण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत करण्यात आले आहे.
आरोग्य शिक्षण
साथरोग प्रतिबंधासाठी नागरिकांना खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
हे करा
• पिण्याचे पाणी गाळून व दहा मिनिटे उकळून प्यावे.
• पिण्याचे पाणी झाकून ठेवावे व पाणी घेण्यासाठी ओगराळयाचा किंवा लांब दांड्याच्या भांड्याचा वापर करावा.
• जेवणापूर्वी व बाळास भरविण्यापूर्वी हात साबणाने / राखेने स्वच्छ धुवावेत .
• पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन गोळ्या किवा द्रावण वापरावे.
• शौचाला जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत
• जुलाब झाल्यास ओ.आर.एस.पाकीटे शासकीय, निमशासकीय दवाखान्यातून मोफत घ्यावीत .तसेच घरात उपलब्ध असलेल्या द्रव पदार्थ उदा.ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी किवा भाताची पेज इत्यादी भरपूर प्रमाणात घ्यावेत.
हे करु नका
• उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत.
• उघड्यावर व माशा बसलेले अन्न खाऊ नयेत.
• शिळे अन्नपदार्थ खाऊ नये.
• उघड्यावर शौचास बसू नये.
• अस्वच्छ व असुरक्षित पाणी पिऊ नये.
आश्रमशाळांविषयी दक्षता
जिल्ह्यातील कार्यरत आश्रमशाळा (निवासी शाळा) येथे पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याची आरोग्य सेवकांमार्फत तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजन (अन्न) नमुने सुद्धा तपासण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
तरी नागरिकांनी पावसाळ्यात आपल्या व आपल्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहिल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी केले आहे.