विरोधकांनी सत्तेवर असताना खुर्च्या उबवण्याचे काम केल्याची टीका करीत लोकसभेचे भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनी गेल्या दहा वर्षांत भाजपने केलेल्या कोट्यवधींच्या कामांची यादीच वाचली. तसेच काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे आज ज्या रस्त्याने फिरत आहेत, ते रस्ते भाजपनेच केल्याचा टोला त्यांनी लगावला.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बूथ समित्यांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. विकासकामे, नेतृत्वाच्या मुद्यावर कोणत्याही चौकात या, चर्चा करू, मीच काय आमचा बुथप्रमुखही आपल्याला उत्तर देईल, असे आव्हान सातपुते यांनी दिले. आमदार सुभाष देशमुख यांनी मतदारसंघातील दहा गावांना जेवढा निधी दिला तेवढा निधीतरी मध्यमध्ये आणला आहे काय, असा सवालही केला.
४० हजार कोटींचे रस्ते, बाह्यवळण रस्ते, विडी कामगारांसाठी ३० हजार घरे, विद्यापीठाला ६५० कोटी, भूमिगत गटारींसाठी ९५० कोटी, मुद्रा योजनेंतर्गत अडीच लाख लोकांना १७ कोटींचे कर्ज, अडीच लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस, ८५० गावांत पाणी या कामांची यादी जाहीर केली.