पुणे, 28 जून (हिं.स.) पुणे महापालिकेने बाणेर-पाषाणला जोडणाऱ्या ३६ मीटर लिंकरोडचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच नागरी समस्यांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
मंत्री पाटील यांनी सोमेश्वरवाडी येथील आयवरी इस्टेट रस्ता, बाणेर कळमकर नाल्यावर एसटीपी प्लांट बसवणे, बालेवाडी हाय स्ट्रीट आणि वाकड पूल जोड रस्ता आदी भागात महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता अमर शिंदे, परिमंडळ क्रमांक २ चे उपआयुक्त गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.
आयवरी इस्टेट-सोमेश्वरवाडी रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, या ठिकाणी पदपथ, पथदिवे ही कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच पुढील टप्प्याच्या कामासाठी भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावीत. लिंक रस्त्यासाठी जागेचे अधिग्रहण, गृहनिर्माण संस्थांची संरक्षक भिंत मागे घेणे इत्यादी कामे तातडीने करावी. अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी तसेच निधीची आवश्यकता भासल्यास प्रस्ताव सादर करावा असेही पाटील म्हणाले.