सोलापूर – शून्य ते पाच पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद करण्याच्या विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून
हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यातील ३५ प्राथमिक शाळांमधील ७० शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे.
कमी पटसंख्या असलेल्या दोन शाळा समूह शाळेत रूपांतर करण्यात येण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे शेकडो शाळांना कुलूप लागणार आहे. यासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून लवकरच आदेश प्राप्त होणार आहेत. त्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा लवकरच बंद होणार आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ३५ शाळांत केवळ १११ पटसंख्या आहे. तर बार्शी तालुक्यातील एका शाळेची पटसंख्या शून्य आहे. एक ते दहा विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या ८६ प्राथमिक शाळा आहेत. शून्य तसेच एक ते पाच पटसंख्या असणाऱ्या शाळा तत्काळ बंद करून विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद कराव्यात, असे पत्र अमरावती येथील शिक्षक उपसंचालकांनी काढले आहे. मात्र, जिल्ह्यात अद्यापही असे पत्र आले नाही. कमी पटसंख्येच्या निर्णयाचे पत्र आल्यास जिल्ह्यातील वाड्या, वस्त्यांवरील शाळा बंद होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करावा. अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे.
…..,
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करावे, असे पत्र वरिष्ठ कार्यालयाकडून आले नाही. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र आल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल.
-प्राथमिक , शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर



















