मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादर येथे देशभरातून लोक दरवर्षी येतात. मुंबईतील, तसेच मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवासाच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यामध्ये मध्य रेल्वेने विशेष लोकल सोडण्याची तयारी केली आहे; तर बेस्ट परिवहन सेवेनेही विशेष बसगाड्या सोडायचे ठरवले आहे.
मध्य रेल्वेचे नियोजन
मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर एकूण १२ विशेष लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी ५ डिसेंबरला रात्री उशिरा आणि बुधवारी ६ डिसेंबरला पहाटे विशेष लोकल धावणार आहेत. अनुयायांना गर्दीचा त्रास होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
बेस्टची सेवा
महापरिनिर्वाणदिनी शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने अनुयायी येतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चैत्यभूमी ते मुंबईतील विविध ठिकाणी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत विशेष बससेवा उपलब्ध असेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे. मुंबई परिसरातून, तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी दादर स्थानक ते शिवाजीपार्क मैदान-चैत्यभूमी येथे जाण्यासाठी ‘चैत्यभूमी फेरी’ नावाने अतिरिक्त बस चालवणार आहेत. दादर स्थानक येथून चैत्यभूमीसाठी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत दररोज १५ ते २० मिनिटांच्या अंतराने बससुविधा उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान ५ डिसेंबरच्या रात्री मुंबईच्या विविध भागांमधून चैत्यभूमीसाठी बसमार्ग क्र. २४१, २००, ए-३५१, ३५४ वर बस चालवण्यात येतील. ६ डिसेंबरला मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतिस्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या अनुयायांसाठी मोफत बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. अनुयायांना ५० रुपयांत तात्पुरत्या स्वरूपाचा दैनंदिन बसपास देण्यात येणार आहे. बेस्टच्या वीजपुरवठा विभागाकडूनही सेवा दिली जाणार आहे. चैत्यभूमी ते शिवाजीपार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज, दादासाहेब फाळके रोड व मादाम कामा रोडला अतिरिक्त दिवे बसवले जाणार आहेत.