सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे रविवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांना किमान तीन ते चार तास रांगेत उभे लागत होते. त्यातच मंदिरातील सुरक्षा रक्षकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. दर्शनसाठी गेलेल्या नाशिकच्या भाविकांना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. यामुळे त्र्यंबकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील महेंद्र सूर्यवंशी आणि त्यांचे आई-वडिलांसह त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करत असताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर जाण्याची घाई केली. त्यावेळी महेंद्र यांची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली.
सुरक्षा रक्षकांची भाविकांना मारहाण
त्यानंतर सुरक्षारक्षकांनी भाविकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. तसेच त्यांच्या वयोवृद्ध आईला ढकलून दिल्याने पायऱ्यांवरून खाली कोसळत त्या जखमी झाल्या आहेत, असा दावा देखील त्यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर येथील सुरक्षा रक्षक मुजोर असून ते भाविकांना दर्शनासाठी जात असताना त्रास देतात. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.