मुंबई : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन करण्यात आलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शपथविधी सोहळ्याला नसणं हे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतंय. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्याच्या चर्चेनंतर मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलवली आहेत. या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये काहीशी अस्वस्थता दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात बैठक बोलवली आहे. या बैठकीत निमंत्रणावरून नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा येथे मनसेची बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभेतल्या कामकाजाचा आढावा आणि आगामी विधानसभा, महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक बोलावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या बदललेल्या भूमिकेनं मनसेत नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच आता मनसे काही वेगळा निर्णय घेणार का? राज ठाकरेंचं पुढचं पाऊल काय असणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
विधानपरिषद निवडणुकीतही भाजपसाठी मनसे एक पाऊल मागे
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या होत्या. पण लोकसभा निवडणुका संपल्यानंतर मात्र, भाजपची भूमिका बदलल्याचा सूर मनसेमधून उमटतोय. लोकसभेनंतर मनसेनं विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानुसार, अभिजीत पानसेंना मनसेकडून कोकण पदवीधरसाठी उमेदवारीही जाहीर करण्यात आली. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असल्यामुळे मनसेनं जाहीर केलेल्या उमेदवारीनं अडचणी वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर भाजपनं राज ठाकरेंची मनधरणी केली. राज ठाकरेंनी भाजपच्या विनंतीचा मान राखून अभिजीत पानसेंची उमेदवारी मागे घेतली.
लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा, राज ठाकरेंकडून प्रचार सभांचा धुरळा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केलं. एवढंच नव्हे तर राज ठाकरे कणकवलीत नारायण राणे, पुण्यात मुरलीधर मोहोळ, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेयांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या सभेच्या व्यासपीठावरही राज ठाकरे दिसून आले होते. या सभेत राज ठाकरे यांना प्रोटोकॉल डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर भाषण करुन देण्यात आले होते. या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर प्रचंड स्तुतीसुमने उधळली होती.