*गोळ्या झाडून तरुणाचा खून*
*उद्योग नगरीत खळबळ*
संजय निकम
वाळूज महानगर (तरुण भारत प्रतिनिधी): एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या तिसगाव-वडगाव मार्गावर साईबाबा चौकात गोळी झाडून एका ३० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती सरपंच सुनील काळे यांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या तरुणाचे नाव कपिल पिंगळे (वय अंदाजे ३२)(रा. रांजणगाव) असे आहे
शुक्रवारी पहाटे साईनगर सिडको येथील महिला कचरा टाकण्यासाठी तिसगाव वडगाव मार्गावरील साईबाबा चौकात गेल्या असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला तरुण दिसला. क्षणात या घटनेची माहिती परिसरात पसरली. पुढे माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार विकास वैष्णव, विशेष शाखेचे योगेश शेळके, विक्रम वाघ, राजेभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, डिबी पथकाचे विनोद नितनवरे, फौजदार मनोज शिंदे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले एक काडतूस आढळून आले.
पोलिसांनी तात्काळ मयताच्या नातेवाईकांची संपर्क साधला असता, कपिलच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो आपला मुलगा कपिलच असल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले. थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झालेल्या आईने आक्रोश करत कपिलच्या मारेकऱ्याचा पोलिसांनी तत्काळ शोध लावावा अशी मागणी केली.
*खुनाचे कारण अस्पष्ट*
कपिल पिंगळेला गोळ्या घालून आरोपीने गावठी कट्टा जागीच सोडून घटना स्थळावरून पळ काढला. अद्याप खुनाचे कारण स्पष्ट झाले नसून आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
*घटनास्थळी शेकडो मित्रांचा गोतावळा*
कपिलचा मित्रपरिवार दांडगा होता. त्याचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी वाळूज औद्योगिक परिसरात पसरली माहिती मिळताच त्याचा मित्रांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. बघ यांची गर्दी आणि कपिलचे मित्र यांना दूर करण्यासाठी पोलिसांना चांगलेच प्रयत्न करावे लागले.
*स्थानीक पोलीस व गुन्हे शाखेला चॅलेंज*
परिसरात अवैध धंदे मोठ्या जोमाने सुरू असल्याने व स्थानीक पोलीसांसह गुन्हे शाखेचा धाक कमी झाल्याने अशा गंभीर घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याने उद्योजक , कामगार वर्ग चिंतेत पडला आहे. या सर्व प्रकारांवर आळा घालून गुन्हेगारी संपुष्टात आणण्याची जबाबदारी व कर्तव्य पोलीस व गुन्हे शाखा यशस्वी पार पाडतील का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात होता . एकाच गावात एकाच ठिकाणी आठवडयातील दोन खुनाच्या घटनेनेने गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना एक प्रकारे चैलेंजच असल्याची चर्चा सुरू होती.
*सलग दोन खुनाने वडगाव लिस्टवर*
वर्ष – दीड वर्षांपासून वडगाव परिसरात खुनाच्या गंभीर घटना घडल्या नव्हत्या त्यामुळे अशा घटनांमुळे नेहमी लिस्ट मध्ये व चर्चेत राहणार वडगाव हे गाव लागलेला बदनामीचा डाग पुसण्यास यशस्वी वाटचाल करीत असतांनाच एकाच आठवड्यात दोन खुनाच्या घटना आणि त्याही १०० मिटरच्या अंतरावर घडल्याने पुन्हा एकदा गावाचे नाव लिस्टवर येऊ लागल्याने गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व सरपंच सुनील काळे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे खंत व्यक्त केली.