मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केवळ देशाला सक्षम नेतृत्त्व मिळावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापोचाळ्यासारख्या उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर यांच्यासारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहित धरु नये, अशा शब्दांत मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरेंनी महायुतीला सुनावलं आहे.
वायव्य मुंबई मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही. इथले खासदार गजानन कीर्तीकर शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीत सेनेकडे आहेत. कीर्तीकर पुन्हा निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे इथून माजी खासदार संजय निरुपम आणि विद्यमान आमदार रविंद्र वायकर यांची नावं चर्चेत आहेत.
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन काँग्रेसनं निरुपम यांचं निलंबन केलं आहे. ते शिंदेंच्या सेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. निरुपम यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर वायव्य मुंबईतून लोकसभा लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. निरुपम शिवसेनेत प्रवेश करतील आणि लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून काही दिवसांपूर्वीच शिंदेंकडे आलेले रविंद्र वायकर यांचं नावही वायव्य मुंबईतून चर्चेत आहे. ते जोगेश्वरी पूर्वचे आमदार आहेत. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या वायकरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. वायव्य मुंबईच्या जागेसाठी त्यांनी शिंदेंची भेट घेतल्याचीही चर्चा आहे.
शिंदेंवर टीकेचे बाण, मनसेचं शरसंधान
मनसेसोबत वाटाघाटी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंसमोर महत्त्वाची अट ठेवली होती. तुमचे उमेदवार ‘धनुष्यबाण’चिन्हावर लढतील, अशी ऑफर शिंदेंनी दिल्याचं वृत्त होतं. आता तोच धागा पकडत मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरेंनी शिंदेसेनेला सुनावलं आहे. ‘मनसेला धनुष्य बाण चिन्हावर लढायला सांगणार्यावर दुसर्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. इकडून तिकडून पालापाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये,’ अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेसेनेचा समाचार घेतला आहे.