यांनी निवडणूक लढवावी की नाही हा त्यांचा प्रश्न आहे, पण आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) जर ते निवडणूक लढवणार असतील तर आम्हीही त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ असं वक्तव्य ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केलं आहे. राज्यातील 199 विधानसभा मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली. सरकारने मराठ्यांना टिकणारं 10 टक्के आरक्षण दिलं असून त्याचा लाभ मराठा समाजाने घ्यायला सुरूवात केली आहे, त्यामुळे मनोज जरांगे यांनी आता यावर राजकारण सुरू केल्याचा आरोपही प्रकाश शेंडगे यांनी केला.
मराठा आरक्षण जर दिलं नाही तर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, विधानसभा कुणी लढवावी आणि कुणी नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मुद्दा आहे तो आरक्षणाचा. मराठा समाजाला सरकारने टिकणारे 10 टक्के आरक्षण दिलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे. मराठा समाजाने ते आरक्षण घेण्यास सुरूवात केली आहे.
199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण
प्रकाश शेंडगे म्हणाले की, जरांगे जर उमेदवार उभे करणार असतील तर ओबीसी उमेदवारही उभा राहतील, आमचं बहुमत आहे. 60 टक्के जाती या ओबीसी आहेत. दलित आणि मुस्लिमांना सोबत घेतलं तर आम्ही 80 टक्के जातो. आमचेही 199 मतदारसंघात सर्व्हे पूर्ण झाले असून आम्हीही तशीच भूमिका घेऊ शकतो.
आर्थिक मागास प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण मिळत असून त्याचा लाभही मराठा समाजाला होत आहे. या मधील 10 टक्क्यांपैकी साडे आठ टक्के आरक्षण हे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतलं आहे असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
मराठा समाजावर गरिबी कुणी आणली?
मराठा समाजावर गरिबी कुणी आणली असा सवाल करत प्रकाश शेंडगे म्हणाले की, ओबीसीतून आरक्षणाची मागणी ही जरांगे यांनी केली आहे. ते मिळालं नाही तर जरांगे निवडणूक लढवणार आहेत. त्यावर आम्हाला कुणाला आव्हान द्यायचं नाही. ओबीसीमधील ज्या काही 375 जाती आहेत, त्या अत्यंत मागासलेल्या आहेत. ते आरक्षण जरांगे यांना काढून घ्यायचं आहे. मराठा समाजाला आम्ही आमचा मोठा भाऊ मानतो. पण गरीब समाजातील आरक्षण काढून घेतलं तर हा समाज गप्प कसा बसेल? मराठा समाजाला गरिबी आली असं म्हटलं जातंय, पण ही गरिबी त्यांच्यावर कोण आणली? त्यांच्याकडेच सर्व सत्ता, बँका आहेत. आरक्षण हा विषय गरिबी हटवण्याचा नाही, तो सामाजिक आहे.
गरिबी हटवण्याचा कार्यक्रम जर राबवायचा असेल तर जरांगे यांनी सरकारकडे तशी वेगळी मागणी करावी, वेगवेगळ्या माध्यमाद्वारे, योजनांद्वारे ही गरिबी हटवली जाऊ शकते असं प्रकाश शेंडगे म्हणाले.
काय म्हटलंय मनोज जरांगे यांनी?
मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने सगेसोयरे मुद्द्याची अंमलबजावणी केली नाही तर विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. राज्यातील 127 विधानसभा मतदारसंघात पहिला सर्व्हे झाला असून इतर मतदारसंघात दुसरा सर्व्हे केला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी केली. तसेच वेळ आली तर मराठा, मुस्लिम, दलित आणि लिंगायत समाजाची मोट बांधून निवडणूक लढवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.