मुंबई गोवा महामार्गा बाबतही त्यांनी या बैठकीत आढावा घेत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका बसवण्याची शक्यता आहे.
गोवा राज्यात जाणाऱ्या कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील पर्यटकांच्या वाहनांना आता टोल द्यावा लागणार आहे. गोवा राज्याच्या एन्ट्री पॉईंटवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर टोलनाके बसवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पार पडलेल्या पणजी गोवा येथील तीन राज्यांच्या प्रमुख मंत्री आणि रस्ते वाहतूक संचालकांच्या बैठकीमध्ये दिले. गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी पत्रादेवी बॉर्डरवर टोल नाका बसवण्याची शक्यता आहे.
पणजी गोवा येथील सिद्धार्थ गोवा या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह तीन राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. गोवा राज्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना आता टोल लागणार असून हा टोल गोव्याच्या एन्ट्री पॉईंटना बसविण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव गोवा शासनाकडून रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आला असून मंत्री गडकरी यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, टोलनाके कधी बसविण्यात येणार तसेच कधीपासून टोल घेण्यास सुरुवात करणार याची अद्याप निश्चिती झालेली नाही.
बैठकीत मंत्री गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते महामार्ग प्रकल्पावरून अधिकारी व ठेकेदार यांची चांगलीच झाडाझडती घेतली. जे अपूर्ण प्रकल्प आहेत ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली असून निधीची कुठेही कमतरता भासणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मुंबई गोवा महामार्गाबाबतही त्यांनी या बैठकीत आढावा घेत अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. दरम्यान, मोपा विमानतळाला जोडला जाणारा महामार्ग फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना या बैठकीत मंत्री गडकरी यांनी दिल्या असून कामाबाबत ही समाधान व्यक्त केले. तर पत्रादेवी ते काणकोण पर्यंतच्या रस्त्यामध्ये काही ठिकाणी महामार्गाचे काम थांबले आहे, ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.