शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बडगुजर यांच्यावरील कारवाईवरुन राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. २३ तारखेला हुतात्मा कान्हेरे मैदानावर ठाकरे गटाचे महाशिबीर आणि खुलं अधिवेशन होईल असे संजय राऊत यांनी सांगितले. यावेळी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर राऊत यांनी भाष्य केले . तसेच सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता पार्टी प्रकरणावरुन राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा दृष्टीने रणशिंग फुंकायचे आहे ते श्रीरामाच्या भूमीतून फुंकले जावे अशी उद्धव ठाकरेंनी श्रद्धा आणि भावना असल्याचे राऊत म्हणाले. नाशिकमधील पंचवटीतून लढाईला सुरुवात होईल अशी माहिती राऊत यांनी दिली.
सलीम कुत्ता पार्टी प्रकरणावरुन भाजपवर टीका
मकाऊचा बावनकुळेंचा व्हिडीओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजरांवर कारवाई ? हे काही कारण होऊ शकते. कायदा असे काम करतो का असा सवाल बडगुजर यांच्यावरील कारवाईप्रकरणी उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत त्यांची शपथ घेऊन सांगतो की त्या व्हिडीओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही. संघ परिवार विशेषतः नागपूर वाल्यांना माहिती आहे की तो व्हीडियो कसा आला ते असे म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावला.
ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती व्यंकटेश मोरेच्या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण दिले होते. त्या (कुत्ता) संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला ? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा. तो एवढा भयंकर गुन्हेगार होता बॉम्बस्फोटमधला तर त्याला तुरूंगातून कोणी सही करून सोडले. याचा तपास भाजपने करावे आणि मग आमच्याकडे बोट दाखवा असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. आजही व्यंकटेश नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल तर जाणं, बसणं चर्चा करणे ही आपली परंपरा आहे..भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वतः कडे बघावं असे म्हणत संजय राऊतांनी नितेश राणेंना टोला लगावला.
पवारांनी अदानींचे कौतुक केले तर चुकीचे काय
शरद पवार यांच्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठान संस्थेला उद्योगपती गौतम अदानी यांनी २५ कोटी रुपयांची देणगी दिल्याने शरद पवार यांनी अदानींचे जाहीर कौतुक केले होते. याबद्दल विचारले असता त्यात चुकीचे काय ? अशा अनेक संस्थांना देणग्या उद्योगपती देत असतात अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. आम्ही पण धारावीचा मोर्चा काढला होता, तो प्रोजेक्ट मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. पवार साहेबांच्या संस्थांना देणगी दिली तर आक्षेप घेण्याचे कारण नाही, पीएम केअरला पण दिलीच होती असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंना घाबरतात
2024 ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जाते ते कळेल असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत. आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण बघितले आहे असे राऊत म्हणाले.
जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ नये
जरांगेवर उपोषणाची वेळ येऊ नये, उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होतोय, नाजूक आहेत. त्यांनी मुंबईत उपोषण केले तर महाराष्ट्रवर ताण पडेल. एक समाज संघर्ष करतोय, जरांगे नेतृत्व करतायत तर सरकारने पाऊल टाकावे अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली.
मोदींपेक्षा आम्ही अयोध्येत जास्त वेळा गेलो आहे
राममंदिर उदघाटन आहे तेव्हाच नाशिकमध्ये आमचे अधिवेशन आहे. आमच्यासाठी पंचवटी हीच आयोध्या आहे. मोदींपेक्षा अयोध्येत आम्ही जास्त गेलो आहे, मोदी पीएम झाल्यावर गेले. आम्ही आंदोलनात गेलो आहे, खटल्यात मी स्वतः आरोपी आहे, आम्हाला अयोध्या नविन नाही. भाजपने आधी स्वतःचे अंतर्वस्त्र साफ करावे त्यांनी आमच्या लेन्सवर बोलू नये. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचे आंदोलन मोठ्या प्रमाणावर झाले. आधी अडवणींना आमंत्रण द्या, त्यांनी रथयात्रा काढली, रामाचे आंदोलन पुढे नेले, त्यांच्यामुळे हे सर्व प्रधानमंत्री, गृहमंत्री, मंत्री झाले. आधी त्यांना बोलवा असे राऊत म्हणाले.