राष्ट्रीय शेअर बाजारात टाटा टेक्नॉलॉजीचा शेअर सकाळी १,२०० रुपये प्रति शेअरच्या तुलनेत दिवसाखेरीस १,३१३ रुपयांवर बंद झाला आहे. अशा स्थिती बाजारातील नवीन गुंतवणूकदारांनी आता काय करावे? ज्यांना IPO मध्ये शेअर्स मिळाले आहेत त्यांनी धरून ठेवावे की विक्री करून प्रॉफिट बुक करावे. आजच्या घडीला टाटा समूहाच्या २९ कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध असून मार्केट कॅपनुसार दिग्गज आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सर्वात मोठी कंपनी आहे.
टाटा समूहाच्या बहुप्रतीक्षित टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओ (प्रारंभिक इश्यू) वर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या नजरा खिळल्या होत्या. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी, ३० तारखेला टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर मार्केट निर्देशांकावर (BSE-NSE) सुचीबद्ध झाले. टाटा टेकच्या शेअर्सनी दणक्यात बाजारात पदार्पण केले आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तिप्पट फायदा करून दिला.
टाटा मोटर्सची उपकंपनी, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची इश्यूची किंमत ५०० रुपये होती, परंतु राष्ट्रीय शेअर बाजारावर १४०% उडी घेत शेअर्स १,२०० रुपयांवर सूचिबद्ध झाले असून त्यानंतरही गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला आणि काही मिनिटातच किंमत १,४०० रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र नंतर प्रॉफिट बुकिंग दिसून आली स्टॉक १,३१३ रुपयांवर बंद झाला.
टाटा शेअरने दिले बंपर रिटर्न्स
कंपनीचा व्यवसाय आणि भविष्यातील शक्यता पाहता टाटा टेक्नॉलॉजी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करेल याबाबत आधीच भाकीत वर्तवले जात होते. तर एक दिवस आधी ग्रे मार्केटमध्ये चांगला प्रीमियम दिला जात होता, पण ३० नोव्हेंबरला सूचिबद्ध होताच सगळेच अवाक झाले.
रिटेल बद्दल बोलायचे तर टाटा टेकचा IPO जवळपास ८० पट भरला गेला. बाजारात पहिल्या दिवशी दमदार लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांना नफा बुक करण्याचा मोह होतो आणि कदाचित शेअर आणखी उडी घेईल असाही विचार करतात. त्यामुळे तुमच्याकडेही टाटा टेकचे शेअर्स असल्यास तुम्ही नफा बुक करून बाहेर पडावे की आणखी काही काळ थांबावे? याबाबतर तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत.
आनंद राठी म्हणाले – ‘होल्ड’ करा
आनंद राठी यांनी टाटा टेकचे शेअर्स धरून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे मूलभूत संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी याबद्दल त्यांना काय वाटते ते सांगितले. त्यांनी म्हटले की, “आम्हाला वाटते की टाटा सारखी मूळ कंपनी आणि त्यांचा व्यवसाय मॉडेल खूप मजबूत आहे. कंपनीकडून दीर्घ मुदतीत खूप चांगली कामगिरी अपेक्षित आहे.”
चॉईस ब्रोकिंग – शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग करावे
चॉईस ब्रोकिंगमध्ये रिसर्च विश्लेषक राजनाथ यादव म्हणाले की, “टाटा टेकचा शेअर लंबी रेसचा घोडा आहे. १,३०० पेक्षा जास्त किमतीत त्याचा PE ७५ पट झाला असून आपल्या भागधारकांच्या बरोबरीने चालत असल्याचे दिसते. त्यामुळे अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांनी प्रॉफिट बुक करावे. तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी त्यात राहावे. ज्यांना बराच वेळ राहायचे आहे ते यावेळी पैसे गुंतवू शकतात.”
मेहता इक्विटीज – घसरणीत खरेदी करा
या फर्मशी संबंधित तज्ञ प्रशांत तपासे यांनी निम्मे शेअर्स विकून नफा खिशात घालण्याचा सल्ला दिला आहे. तर उर्वरित शेअर्स दीर्घ मुदतीसाठी ठेवण्याचेही त्यांनी म्हटले. तसेच ज्यांना आयपीओ मिळाला नाही आणि टाटा टेकचे शेअर्स खरेदी करायचे आहेत ते स्टॉक घसरल्यावर खरेदी करू शकतात. ब्रोकरेजने म्हटले की त्यांना शेअरच्या प्रत्येक घसरणीवर लक्ष ठेवून राहावे लागेल.
स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट – होल्ड करा
या फर्मच्या वेल्थ प्रमुख शिवानी न्याती यांनी दीर्घकाळासाठी शेअर होल्ड करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे.