राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणूक भाजपनं जिंकली. निवडणूक जिंकून ५ दिवस होत आले तरीही अद्याप भाजप नेतृत्त्वाला मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित करता आलेली नाहीत.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचा निर्णय अद्याप भारतीय जनता पक्षाला घेता आलेला नाही. तेलंगणात काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण भाजपला अद्याप मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित करता आलेली नाहीत. आता भाजपनं यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठी भाजपनं पर्यवेक्षकांची नावं जाहीर केली आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांच्याकडे राजस्थानच्या पर्यवेक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसाठीही पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशची जबाबदारी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, के. लक्ष्मण, आशा लकडा, तर छत्तीसगडची जबाबदारी अर्जुन मुंडा, सर्वानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांच्याकडे देण्यात आली आहे.
तीन राज्यांचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपनं पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. पर्यवेक्षक आमदारांशी संवाद साधतील. त्यांची मतं जाणून घेतील. आमदारांच्या मनातील भावना पक्षनेतृत्त्वापर्यंत पोहोचवतील. यानंतर रविवापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा होऊ शकते. भाजपनं मध्य प्रदेशातील सत्ता राखली. तर राजस्थान, छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसला पराभूत केलं. त्यामुळे हिंदी पट्ट्यात भाजपनं आपलं वर्चस्व आणखी वाढवलं. लोकसभा निवडणुकीआधी तीन राज्यांमधील विधानसभा जिंकल्यानं भाजपला बूस्टर मिळाला आहे.
विशेष म्हणजे भाजपनं गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे चेहरे समोर ठेवून निवडणूक लढवली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर भाजप निवडणुकीला सामोरा गेला. पण यावेळी भाजपनं मुख्यमंत्रिपदाचे चेहरे न देता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर निवडणूक लढवली आणि जिंकली. लोकसभा निवडणुकीआधी मोदींच्या चेहऱ्यावर भाजपला मिळालेलं यश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आता तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडण्याचं आव्हान नेतृत्त्वासमोर आहे. काही महिन्यांवर आलेली लोकसभा निवडणूक पाहता मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेत्याची निवड करणं पक्षासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.