लेखिका, संशोधिका, लघुपटकार डॉ. अंजली कीर्तने (७०) यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी माहीम येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. शनिवारी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि मातोश्री कवयित्री पद्मिनी बिनीवाले आहेत. गेले काही काळ त्यांची आजाराशी झुंज सुरू होती. त्याचवेळी त्यांचे अखेरच्या पुस्तकावरही काम सुरू होते.
गेले काही महिने त्यांचा आजाराशी लढा सुरू होता. रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांचे ‘शेवटच्या आठवणींचा पायरव’ या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या व्यक्तिचित्रांवर आधारित पुस्तकावर काम सुरू होते. ते पुस्तक अवघ्या काही दिवसांपूर्वी मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केले. कीर्तने यांनी लिहिलेली पुस्तके ही त्यांच्या सखोल अभ्यासाची आणि संशोधनाची जाणीव करून देतात. हे लेखन करत असताना त्यांनी या चरित्रांवर आधारित लघुचरित्रपट करण्याचाही ध्यास घेतला. त्यानुसार त्यांनी प्रशिक्षणही घेतले. त्यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावर चरित्रपट तयार केला. त्यानंतर दुर्गा भागवत, पं. पलुसकर यांच्यावरही चरित्रपट तयार केले. आनंदीबाई जोशी या चरित्रपटामुळे डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या चरित्राची मागणीही वाचकांकडून होऊ लागली. आनंदीबाई जोशींवरील त्यांचे इंग्रजी पुस्तकही लोकप्रिय आहे. त्यांनी ८०च्या दशकामध्ये लेखनाला सुरुवात केली. मोलिएरचा मराठी नाटकांवरील प्रभाव या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. पदवी शिक्षण घेताना त्यांना मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळाला होता. याशिवाय त्या भरतनाट्यम्, सतार वादन करायच्या. त्यांनी या दोन्ही कलांचे शिक्षण घेतले होते.
कीर्तने यांनी ‘डॉ. आनंदीबाई जोशी- काळ आणि कर्तृत्व’, ‘पाऊलखुणा लघुपटाच्या’, ‘गानयोगी पं. द. वि. पलुस्कर’, ‘बहुरूपिणी दुर्गा भागवत-चरित्र आणि चित्र’, ‘चेरी ब्लॉसम’, ‘माझ्या मनाची रोजनिशी’, ‘कॅलिडोस्कोप’, ‘हिरवी गाणी’, ‘ मनस्विनी प्रवासिनी’, ‘आठवणी प्रवासाच्या’, ‘वेडा मुलगा आणि शहाणी माकडे’, ‘अभिजात संगीताचे सुवर्णयुग’ आदी पुस्तके लिहिली. यंदाच्या वर्षी त्यांची आठवणींचा पायरवसोबतच ‘सोयरिक घराशी’, ‘षड्ज एकांताचा’ हा काव्यसंग्रह ही पुस्तकेही प्रकाशित झाली. त्यांनी म. वा. धोंड आणि वा. ल. कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या मराठी वाङ्मय कोशाच्या समीक्षा खंडात उपसंपादक म्हणून काम केले. १९८२ ते १९८६ या कालावधीत त्या पॉप्युलर प्रकाशनाच्या मराठी विभागात कार्यकरत होत्या. मॅजेस्टिकच्या ‘दीपावली’ आणि ‘ललित’मधून त्यांनी सातत्यपूर्ण लेखन केले. यंदाच्या ‘दीपावली’च्या दिवाळी अंकातही त्यांचा लेख होता. राज्य सरकारच्या आणि अन्य संस्थांच्या विविध पुरस्काराने डॉ. कीर्तने यांच्या लेखनाचा गौरव झाला आहे. त्यांच्या निधनामुळे एक मनस्वी, व्यासंगी, बहुरूपी, साक्षेपी लेखिका काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे.