BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाहीर माहितीनुसार 2024 मध्ये 5 जानेवारी पासून सोलापुरातील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर असा 4 दिवसीय रणजी सामना होणार असल्याचे कळते.
मिलिंद गोरे यांनी दिलेल्या माहिती नुसार, 1994 नंतर म्हणजेच तब्बल 29 वर्षांनी सोलापूरात रणजी करंडक मधील सामना होत असून 23 डिसेंबर 1994 रोजी शेवटचा रणजी सामना मुंबई – महाराष्ट्र संघात झाला होता जो अनिर्णीत अवस्थेत संपला होता पण मुंबई संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली होती. त्याकाळी आधी मर्यादित षटकांचे (एकदिवसीय पद्धतीचे) सामने व्हायचे आणि लगेच 4 दिवसीय सामना. त्याकाळी झालेल्या सामन्यात दोन्ही संघातील अनेक दिग्गज खेळाडूंनी आपले दमदार प्रदर्शन केले होते ज्यात महाराष्ट्र कडून इक्बाल सिद्दीकी, जेधे, गुदगे, किणीकर, सुगवेकर, चितळे, भावे, काळे तर मुंबई कडून सुनील मोरे, अमोल मुजुमदार, कुरुविला, संजय मांजरेकर, म्हांबरे, दिघे यांचा समावेश होता.
त्या सामन्यात त्यावेळच्या बॉम्बे संघाने पहिल्या डावात 573 धावांचा डोंगर उभा केला होता तो अमोल मुजुमदार चे दमदार द्विशतक 220, सुनील मोरे 166,दिघे 69 यांनी केलेल्या दमदार प्रदर्शनाने. महाराष्ट्र संघ पहिल्या डावात सर्वबाद 361 धावाच करू शकला होता ज्यात शंतनु सुगवेकर 160,सुनील गुदगे 55, हृषिकेश कानिटकर 44 धावा केले होते.
मुंबई ने त्यांच्या दुसऱ्या डावात 3/123 धावा केलेल्या. अनिर्णीत राहिलेल्या ह्या सामन्यात सुनील गुदगे व पारस म्हांबरें यांनी 5 बळी घेतले होते.
त्यामानाने मणिपूर संघ कमजोर असला तरी ते महाराष्ट्राच्या संघासमोर त्यांचे प्रदर्शन कसे करतील हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
यापूर्वी या दोन्ही संघात रणजी स्पर्धेत कधीच सामना झालेला नाहीये. मागील वर्षी मणिपूर संघ प्लेट गटात होता व त्यात साखळी फेरीत 3 सामने जिंकून अंतिम सामन्यात त्यांना बिहार कडून पराभव स्वीकारावा लागला होता.
तर दुसरीकडे महाराष्ट्र संघाने Elite B गटात साखळी 7 सामन्यात 3 विजय मिळविले होते.
तर यावर्षी महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर यांच्यात नुकताच विजय हजारे या मर्यादित षटकांच्या स्पर्धेत सामना झाला होता व त्यात महाराष्ट्राने तब्बल 167 धावांनी सामना जिंकला होता तो 427 धावांचा डोंगर रचत.
सध्या विजय हजारे स्पर्धेनंतर महाराष्ट्राच्या संघाचे सराव शिबिर पुणे येथे चालू असून त्यातून महाराष्ट्राचा संघ लवकरच निवडला जाणार आहे.