बीडमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जण ठार झाले आहेत. एका अपघातात रुग्णवाहिकेने ट्रॅव्हलला धडक दिली यात चार, तर दुसऱ्या अपघातात ट्रॅव्हल बस उलटल्याने ६ जण ठार झाल्याची माहिती आहे.
अधिक माहिती अशी की, दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (एमएच २१ एक्स ८६००) हा धामणगावकडून अहमदनगर दिशेने जात होता. रात्री साडे अकरा वाजेदरम्यान व्यंको कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेने (एमएच १६ क्यू ९५०७) जोरदारची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत सिताराम लोखंडे, (३५, रा. धामणगाव ता. आष्टी), मनोज पांगु तिरपुडे, पप्पू पांगू तिरखंडे, (दोघे रा. जाट देवळा, ता. पाथर्डी) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. डॉ. राजेश बाबासाहेब झिंजुर्के, (३५, रा. सांगवी पाटण, ता. आष्टी) यांचा मॅक केअर हॉस्पीटल, अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर ज्ञानदेव सूर्यभान घुमरे, (४५, रा. घाटा पिंपरी, ता. आष्टी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मॅक केअर हॉस्पीटल अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.
दुसरा अपघात गुरुवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी साडेसहा वाजता झाला. मुंबईकडून बीडकडे जात असलेली सागर ट्रॅव्हल्सची बस पलटी होऊन झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला. इतर अनेक प्रवासीही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. जखमींना आष्टी व नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.