महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळे लोकप्रिय झालेला पृथ्वीक प्रताप पूर्वी भाड्याच्या घरात राहायचा. आता त्याने स्वत:चे हक्काचे घर घेतले आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो आता केवळ महाराष्ट्रापुरताच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाला आहे. दिवसभराचा क्षण घालवण्यासाठी विरंगुळा म्हणून प्रेक्षकांची या शोला पहिली पसंती असते. या शोमधील प्रत्येक पात्र आता घराघरात लोकप्रिय झाले आहे. विनोदाचा टाइमिंग आणि उत्तम अभिनय या दोन्ही कलागुणांवर शोमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने आपली वेगळी ओळख निर्माण केली. महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोने कलाकारांना जगासमोर स्वतःला सादर करण्याची संधी मिळवून दिली होती ज्याचे सोने सर्वांनीच केल्याचे पाहायला मिळते.
अभिनेता पृथ्वीक प्रताप महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमुळेच घराघरात पोहोचला. त्याच्या विनोदी अभिनयाने त्याला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. पृथ्वीक आता कुठेही गेला तरीही सेल्फी किंवा ऑटोग्राफ साठी त्याच्यापुढे रांग लागते. मात्र पूर्वी हे चित्र थोडे वेगळे होते. त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्याने अनेक मुलाखतीत सांगितले होते. आज पृथ्वीकचा वाढदिवस आहे.
अभिनेता पृथ्वीक प्रतापने काही दिवसांपूर्वी स्वतःचे घर घेतले. यासंदर्भातील पोस्ट त्याने खास आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती ज्यावर सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. पण यापूर्वी पृथ्वी एका भाड्याच्या घरात राहत होता.
‘संपूर्ण स्वराज्य’ यूट्यूब चैनलला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीकने त्याला मिळालेल्या पैशांचा तो कसा वापर करतो याबद्दल सांगितलेले.
“मला महिन्याला ६० हजार रुपये मिळतात. त्यात २० हजार रुपये घरभाडं, १० हजार रुपये एसआयपी, १० हजार रुपये इन्शुरन्स यात ४० हजार जातात”. “उरलेल्या पैशांत मी माझं आयुष्य जगतो. उरलेल्या २० हजार रुपयात मेडिकल, भाजीचा खर्च सगळं निघतं. बाकी गोष्टीत मला दादा-वहिनीची मदत होते”.