केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल येथील रॅलीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून मोदी सरकारला कोणीही रोखू शकत नाही असे अमित शाह यांनी ठणकावले
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्यापासून केंद्र सरकारला कोणीही रोखू शकणार नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह ‘सीएए’ला विरोध असणाऱ्यांना बुधवारी जणू आव्हानच दिले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार रॅलीला अनौपचारिक प्रारंभ करण्यासाठी भाजपकडून अमित शहा यांची कोलकाता येथे बुधवारी रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहा यांनी धार्मिक तुष्टीकरण, घुसखोरी, भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार या मुद्यांवरून ममता यांना लक्ष्य केले. केंद्रात २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोक निवडून देणार आहेत. राज्यात ही २०२६ मध्ये भाजप सरकारच्या स्थापनेसाठीची पायाभरणी ठरेल, असा दावाही त्यांनी केला.
‘सीएए’ला ममता बॅनर्जी यांनी विरोध केला. मात्र, देशात कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कोणीही ‘सीएए’च्या अमलबजावणी करण्यापासून रोखू शकणार नाही. संसदेने २०१९ मध्ये या कायद्यास संमती दिली आहे. घुसखोरीच्या मुद्यावरून एकेकाळी ममतांनी संसदेचे कामकाज रोखून धरले होते. आता मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे आता तेथे कोणीही घुसखोरी करू शकत नाही, असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४२ पैकी १८ जागा भाजपच्या वाट्याला आल्या होत्या.
काय म्हणाले अमित शहा?
– आगामी काळात जनता ममता यांचे सरकार उखडून फेकून देईल
– याची सुरुवात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून होईल
– मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी पश्चिम बंगालने भाजपला कौल द्यावा
– गेल्या वेळी हेराफेरी करून राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार आले
– मात्र, आता त्याची राज्यात पुनरावृत्ती होणार नाही
– केंद्राकडून निधी मिळत नसल्याचा तृणमूल काँग्रेसचा दावा खोटा