मुंबईच्या वन अविघ्न इमारतीमध्ये आज दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर आग लागली. अग्निशमन विभागाकडून लेव्हल चारचा अलर्ट देण्यात आल्यामुळे आगीचं स्वरूप गंभीर असल्याची बाब समोर आली. यादरम्यान अग्निशमन विभागाच्या जवळपास २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अग्निशमन विभागाच्या फायर पंप्सला मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. १९व्या मजल्यावर लागलेली ही आग विझवण्यासाठी पाण्याचा फवारा दिला जात असताना हा फवारा फक्त त्या मजल्याच्या गॅलरीपर्यंतच पोहोचत असल्याचं दृश्यांमधून दिसून आलं. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागासमोर इतक्या अडचणी का उभ्या राहिल्या याची कारणं इमारतींच्या बांधकाम पद्धतीत आणि अग्निशमन विभागाच्या यंत्रसामग्रीमध्ये आहेत.
माजी अग्निशमन अधिकारी प्रताप करगुप्पीकर यांनी यासंदर्भात एबीपीशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. यानुसार, वन अविघ्न इमारतीची उंची जास्त असल्यामुळे अशा ठिकाणी शिडीपेक्षाही जास्त उंचीच्या ठिकाणची आग विझवण्यात अडचणी येतात. त्यामुळेच वन अविघ्न इमारतीमध्ये १९व्या मजल्यावर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाची शिडी फक्त १८व्या मजल्यापर्यंतच पोहोचू शकली. त्यासाठी पाण्याचा मारा करताना फक्त गॅलरीपर्यंतच पाणी पोहोचू शकत असल्याचं दिसून आलं.
साधारणपणे उंचावर लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये जास्त उंचीची शिडी घेतली, तरी हवेच्या वेगावर तिची परिणामकारकता अवलंबून असते. ७० मीटरची शिडी १८व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते, १०० मीटरची शिडी साधारणपणे २१व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते. मात्र, इतक्या उंचीवर जर हवेचा वेग जास्त असेल, तर या शिडी आपोआप बंद होतात. त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक सेन्सर्स बसवलेले असतात. त्यामुळे जास्त उंचीवर देखील आग विझवण्यासाठी पोहोचणं कठीण होऊन जातं. वन अविघ्न इमारतीवर १८व्या मजल्यापर्यंत अग्निशमन दलाची शिडी पोहोचू शकली.