सोलापूरसह नगर, पुणे, धाराशिव या शहरांसाठी वरदायिनी असलेले उजनी धरणातील पाणीसाठा सध्या मायनस ४४ टक्क्यांवर आहे. सोलापूर शहरासाठी आता १० मेपासून उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाणार आहे. त्यावेळी साधारणत: पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. हे आवर्तन सोडल्यावर धरण उणे ५५ टक्के होईल. त्यावेळी धरणावरील ४१ पाणीपुरवठा योजनांपैकी ९९ टक्के योजना बंद पडणार आहेत.गतवर्षी सोलापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने उजनी केवळ ६६ टक्क्यांपर्यंतच भरले होते. मागील सहा महिन्यांत धरण रिकामे झाले आहे.
सध्या जिल्हाभर दुष्काळाची दाहकता वाढत असून उन्हाची तीव्रता देखील वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सव्वाशेहून अधिक टॅंकर सुरू झाले आहत. त्यातच धरणावर अवलंबून श्री सिद्धटेक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक, कर्जत, धनस्मृती टेक्स्टाईल प्रा.लि. झरे, नेचर डिलाईट प्रा.लि. कळस, भैरवनाथ शुगर प्रा.लि. आलेगाव, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, वनगळी, रे नगर फेडरेशन कुंभारी, हरनेश्वर ॲग्रो लि. कळस (ता. इंदापूर), बारामती ॲग्रो लि. पिंपळी, अंबालिका शुगर वर्क्स प्रा.लि. अंबालिका नगर, कर्जत, भैरवनाथ शुगर वर्क्स, विहाळ युनिट-दोन, श्री मकाई साखर कारखाना, भिलारवाडी, युटोपीयन शुगर लि. यांचाही पाणीपुरवठा उजनीची पातळी खालावल्याने बंद पडला असून काहींचा पाणीपुरवठा लवकरच बंद पडेल, अशी सद्य:स्थिती आहे.