राज्यात आज 11 लोकसभा जागांवर मतदान होत आहे. या निवणुकीत ईव्हीएमच्या वापरावर विरोधकांकडून वारंवार संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकतं असं दावा विरोधकांनी अनेकदा केला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करुन दाखवा असं आव्हान सर्व पक्षांना केलं होतं. त्यावेळी सर्वांनी माघार घेतली. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अडीच कोटी रुपये द्या ईव्हीएम हॅक करून तुमच्या उमेदवाराला जिंकून देतो असं सांगणाऱ्या एका व्यक्तीला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
महत्त्वाचं म्हणजे हा व्यक्ती भारतीय सैन्यात हवालदार म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मारुती नाथा ढाकणे असे या माणसाचं नाव आहे. नगर जिल्ह्यातील काटेवाडी या गावचा हा रहिवासी आहे. या आरोपीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना फोन करून अशा पद्धतीची ऑफर दिली. गेले सहा महिने हा व्यक्ती अंबादास दानवे यांना फोन करत होता. मात्र, अखेर अंबादास दानवे यांना या सगळ्या प्रकरणाचा संशय आला. त्यांनी संभाजीनगर पोलीस आयुक्तांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी ट्रॅप करून या माणसाला आज संभाजीनगरच्या एका हॉटेलमध्ये अटक केली आहे. याबाबत आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत.