औरंगाबाद- अवघ्या दहा वर्षाच्या मुलाला किडनीच्या आजाराने ग्रासले असताना जन्मदाती आईने आपली किडनी देत त्या मुलाला पुनर्जन्म मिळवून दिला. दुर्मिळ अशी ही शस्त्रक्रिया कमलनयन बजाज रुग्णालयात पार पडली. लहान बालकामध्ये किडनी प्रत्यारोपण आणि त्यानंतरचे प्रदीर्घ चालणारे उपचार आता औरंगाबादमधील कमलनयन बजाज रुग्णालयात एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
जन्मापासूनच किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या बालकाचे कमलनयन बजाज रुग्णालयात बाल किडनी विकार तज्ञ डॉ. पंकज भंसाळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू होते. औषधोपचारावर नऊ वर्षे बालकाची प्रकृती स्थिर राहिली. परंतु, कालांतराने किडनीची क्षमता घटल्याने क्रियाटनीन व युरिया हे रक्तातील घटक वाढत गेले. बालकास त्रास वाढल्यामुळे कमलनयन बजाज रुग्णालयात डायलिसीस चालू झाले. डायलेसिस बंद व्हावे यासाठी किडनी प्रत्यारोपण हाच एक मार्ग असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर रुग्णाच्या आई आपली किडनी देण्यासाठी तयार झाल्या. संपूर्ण वैद्यकीय तपासण्याअंती त्या उत्कृष्ट डोनर दिसून आल्या. अवयव प्रत्यारोपण समन्वयकांनी कायदेशीर बाबी पूर्ण करून शासनाकडून किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी लागणारी परवानगी मिळवली. किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. समीर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्ण भरती झाला. ९ डिसेंबर २०२२ रोजी कमलनयन बजाज रुग्णालयात किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. समीर महाजन, बाल किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. पंकज भंसाळी, किडनी प्रत्यारोपण सर्जन डॉ. शरद सोमाणी व डॉ. आदित्य येळीकर, भूलतज्ञ डॉ. सचिन नाचने व टीम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाले असून बालकाची प्रकृती उत्तम आहे. शिवाय बालकाला रुग्णालयातुन सुटीदेखील मिळाली आहे. या दरम्यान मेडिकल डायरेक्टर डॉ. मिलिंद वैष्णव व बालरोग विभागप्रमुख डॉ. निखिल पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.
लहान बालकामध्ये किडनी प्रत्यारोपण आणि त्यानंतरचे प्रदीर्घ चालणारे उपचार आता औरंगाबादमधील कमलनयन बजाज रुग्णालयात एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामध्ये बाल व नवजात शिशु अतिदक्षता विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नताशा वर्मा यांनी सर्व टीमला या यशाबद्दल शुभेच्या दिल्या. रुग्णालयाचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी यांनी त्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्या दिल्या आहेत.
मोठ्याप्रमाणेच लहान मुलांच्या किडनी निकामी झाल्यास तीन पर्याय उपलब्ध असतात. हिमोडायलेसीस, पेरीटोनियल डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण. यापैकी लहान मुलांची शारीरिक व मानसिक वाढ लक्षात घेता त्यांना दीर्घ आयुष्य मिळण्याकरीता किडनी प्रत्यारोपण हा एकमेव लाभदायक पर्याय असतो, असे किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. समीर महाजन यांनी सांगितले.
बालबाह्य रुग्ण विभागात दहा टक्के रुग्णांना किडनी संदर्भातील विकार आढळून येतात. त्यातील बहुतांश विकार हे वेळीच तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे बरे होतात. लहान मुलांमधील किडनी विकार यावरील उपचार पद्धतीमध्ये अतिशय सुधारणा होत आहेत. ज्या बालकांमधील किडनी निकामी असेल त्यांसाठी देखील डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कमलनयन बजाज रुग्णालय औरंगाबाद येथे उपलब्ध आहेत. किडनीचे आजार क्लिष्ट असले तरी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार मिळाल्यास बाळाचे आयुष्य प्रदीर्घ आणि सुखकर राहू शकते, असे बाल किडनी विकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ. पंकज भंसाळी यांनी नमूद केले.



















