ज्या लोकांनी आपलं बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. आमचे कर्तव्य आहे त्यांना अभिवादन केलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी रक्त सांडून आम्हाला मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला हा महाराष्ट्र कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही. जे जे महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवतात त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि जिद्द काय असते ते येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही लुटारूंना दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंनी आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अदित्य ठाकरे, नेते अनिल देसाई, संजय दिना पाटील, अरविंद सावंत, सचिन अहिर, सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, आज महाराष्ट्र दिवस आहे. फक्त हुतात्म्यांना अभिवादन करून चालणार नाही. ज्यांनी आपल्याला मुंबई, महाराष्ट्र मिळवून दिला ते आपल्याकडे बघतायत. मी शपथ घेऊन सांगू इच्छितो प्राण गेला तरी चालेल पण महाराष्ट्र जाऊ देणार नाही. महाराष्ट्र गद्दार नाही. शुरांना वंदन करायचे असते परंतु चोर आम्ही वंदिले असे भाजपचे चालू आहे.
महाराष्ट्र दिनाविषयी
महाराष्ट्र आणि मराठी मनाच्या दृष्टीने आनंदाचा, अभिमानाचा आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला यश मिळाले. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, निपाणी हे जिल्हे देखील महाराष्ट्रात यावे ही मागणी होती. मात्र, ही मागणी अद्यापही पूर्ण झाली नाही. त्यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे.