मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा संदीपकुमार देशमुख
व मुन्ना देशमुख यांचे खा. शरद पवारांना निवेदन
मुदखेड ता प्र
केंद्र सरकारच्या इतर मागास प्रवर्ग यादीत ‘मराठा’ जातीचा समावेश व्हावा याकरिता खा. शरदचंद्र पवारांनी केंद्र सरकारला विनंती करावी अशा प्रकारच्या आशयाचे सविस्तर निवेदन राहुल गांधी टीमचे सदस्य संदीपकुमार देशमुख बारडकर आणि संदीप देशमुख तरोडेकर यांनी पुणे येथे भेटून त्यांच्या हाती सादर केले.
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर आहे. त्यासाठी श्री मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मागच्या एक वर्षांपासून लढा सुरू आहे. इंद्रा सहानी यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या बाबतीत घालून दिलेली चौकट पाहता ५०% च्या वरील आरक्षण हे न्यायालयात पात्र ठरेल अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे राज्यातील गायकवाड, शुक्रे, बांटिया अशा विविध आयोगाच्या अहवालाचा आधार घेत केंद्र सरकारला ‘मराठा’ ही जात इतर मागास प्रवर्गातील जातीच्या सूचीत समाविष्ट करून मराठा समाजाला टिकणाऱ्या आरक्षणाचा लाभ प्राप्त करून द्यावा अशा प्रकारची विनंती खा. पवारांना निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन खा. पवारांनी सविस्तर वाचून आपल्या स्वीय सहाय्यकाकडे सुपूर्द केले.
बांटीया आयोगानुसार राज्यात ओबीसी लोकसंख्या ही जवळपास ३८% आहे. तर राज्यात ३८% ओबीसींना ३२% आरक्षण आहे. राज्यात आरक्षण न प्राप्त असलेली मराठा लोकसंख्या ही जवळपास २६% आहे. तेव्हा जुने ओबीसी ३८% आणि मराठा २६% अशी एकूण लोकसंख्या ६४% आहे. आज जे ३२ % ओबीसींना आरक्षण लागू आहे, त्यात मराठा समाज आजपर्यंत समाविष्ठ झाला नाही.
त्यास थेट न्याय मिळवून देण्यासाठी राज्य मागास आयोगाच्या विविध अहवालाचा आधार घेत केंद्र सरकारला मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या यादीत करता येऊ शकतो असे संदीपकुमार देशमुख आणि संदीप देशमुख तरोडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. राज्य मागास आयोगाचा अहवाल केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने मान्य करून त्यावर संसदेच्या बहुमताची मोहर घेतल्यास राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने मराठा जात केंद्राच्या ओबीसी जात समूहात समाविष्ट होईल आणि आणि मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळेल अशी प्रतिक्रिया निवेदनकर्त्यांनी दिली.