पुणे, 29 जुलै (हिं.स.)। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येत असून, नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे. मतदारांना विशेष मोहिमेची माहिती देण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत विविध जनजागृती उपक्रमदेखील राबविण्यात येत आहेत.
विशेषत: नवमतदारांना मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. मतदार नोंदणीसोबत मतदार यादीतील तपशिलात दुरुस्ती करण्यासाठीदेखील शिबिरात अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. मतदार यादीत नाव नसल्यास किंवा तपशीलात बदल करायचा असल्यास नागरिकांनी या विशेष शिबिरात सहभाग घ्यावा किंवा जवळच्या मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी केले आहे.
वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या युवकांना मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. मतदार यादीत नाव आहे किंवा कसे याबाबत www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल अॅपवर संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर समजेल