अमरावती 5 ऑगस्ट (हिं.स.)।शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, अशा लोकांवर ताडा कोर्ट लागला पाहिजे. त्यांना कारागृहात टाकून मोकळं व्हायला पाहिजे. ते अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातला माणूस यूपीमध्ये आहे. ओडिशामध्ये आहे. महाराष्ट्रातील माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे. मध्यप्रदेशात आहे. गुजरातमध्ये सुद्धा आहे त्यांचं काय करायचं? समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत, समाज दुभंगला की देश दुभंगतो. युएपीए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट यांच्यावर लागला पाहिजे. ओबीसी हा मराठ्याला आणि मराठा ओबीसीला मतदान करणार नाही. आपलं आरक्षण जातंय, याची जाणीव झालेली आहे. मराठवाड्यातून विदर्भात आलो तेव्हा पहिली बैठक ओबीसीसोबत झाली विदर्भातला कुणबी हा ओबीसी आहे.
पण ऐरणीची वेळ आली तर हा कोणासोबत असेल? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. तसेच बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या तयारीत आहे यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्याचं काही अस्तित्व नाही त्यावर मी कमेंट करणार नाही.प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, आरक्षण बचाव यात्रा सुरू केली. याला यश मिळालं आहे. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या यात दोन गट पडले .
एक मराठा आणि दुसरा ओबीसी… मात्र काही जणांचे मनसुबे या यात्रेतून ते उध्वस्त झाले आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेसंदर्भात त्यांनी महत्त्वाचे विधान केले. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचे सांगितले. तसेच शिवसेनेला (उबाठा) लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते आणि त्यांचा वाढलेला मत टक्का यामागे उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची मदत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.