सांगोला – रेल्वे क्र.०१४५१ आणि ०१४५२ कोल्हापूर-कलबुर्गी- कोल्हापूर एक्सप्रेस रेल्वेस किमान १ वर्ष मुदतवाढ देण्यात यावी या मागणीचे निवेदन सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू असून त्याची मुदत २० नोव्हेंबर पर्यंत असल्याने त्या गाडीस कोल्हापूर, सांगली, सोलापूर, कलबुर्गी या चारही जिल्ह्यातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर सोय होत असल्याने सदरची रेल्वे सेवा सुरू ठेवून या रेल्वेस किमान एक वर्ष मुदतवाढ किंवा कायमस्वरूपी ही रेल्वे सोडण्यात यावी व या रेल्वेस देवदर्शन एक्सप्रेस नाव देण्यात यावे, ०१४७७ आणि ०१४७८ सोलापूर-अनाकापल्ली या रेल्वेचा विस्तार मिरज स्थानकापर्यंत करण्यात यावा, ११०२७ आणि ११०२८ दादर-सातारा-दादर एक्सप्रेस रेल्वे दररोज सोडावी, सांगोला स्टेशनवर कोच इंडिकेटर सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
सांगोला-पुणे-सांगोला एक्सप्रेस रेल्वे दररोज सुरू करावी, कोल्हापूर-नागपूर एक्सप्रेस दररोज सोडावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती महाप्रबंधक मध्य रेल्वे मुंबई, खा.प्रणितीताई शिंदे, खा.धनंजय महाडिक, खा.विशाल पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, पुणे यांनाही देण्यात आले आहेत. सदर रेल्वे प्रवाशांकरिता फायदेशीर असून संघटनेने सुरुवातीपासूनच सर्वांना सोईस्कर गाड्या कायमस्वरूपी धावण्याकरिता रेल्वे प्रशासन, सर्व विभागाचे खासदार यांच्या मार्फत पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू आहे त्यास यश मिळेल असे संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे यांनी सांगितले.
अशोक कामटे सामाजिक संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे
कोल्हापूर-कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वे नियमित सुरू राहण्याकरिता रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. इतरही नवीन रेल्वे बाबतीत विभागाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल.
-खा.धैर्यशील मोहिते-पाटील

















