सोलापूर – शहरातील विजापूर रोडवरील आरटीओ ऑफिस जवळ असलेल्या गणेश नगरातील श्री समर्थ ज्वेलर्स या दुकानावर तीन दरोडेखोरांनी कोयता आणि नकली पिस्तुलाच्या सहाय्याने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी दुकान मालकाच्या प्रसंगावधानामुळे दरोडेखोरांच्या दरोड्याचा प्रयत्न फसला असून केवळ काचा फोडून दहा हजाराचे नुकसान झाले आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
याबाबत श्री समर्थ ज्वेलर्सचे मालक दीपक वेदपाठक राहणार चौडेश्वरी मंदिर जवळ विजापूर रोड सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी 7:45 च्या सुमारास गणेश नगर येथील श्री समर्थ ज्वेलर्स या दुकानात दुकान मालक दीपक वेदपाठक तसेच एक महिला कर्मचारी व एक पुरुष कर्मचारी असे तिघेजण दुकानात होते त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोर हे काळे रंगाच्या सॅग बॅग्स सह दुकानात आले व एक जण दुचाकी वरच बसून राहिला दुकानात आलेल्या दोन दरोडे खोरांपैकी एकाने कोयत्याचा तर दुसऱ्याने नकली पिस्तुलाचा धाक वेदपाठक व त्यांच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना दाखवून दुकानातील सोन्याचे दागिने मागितले दागिने न देता वेदपाठक यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली त्यावेळी एका ने कोयत्याने दुकानातील काउंटर च्या काचा फोडल्या आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली दरम्यान मालकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने दोघे दरोडेखोरांनी दुकानातून बाहेर पडून दुचाकी वरील बसलेल्या आपल्या साथीदारांच्या सहाय्याने दुचाकीवरून पळ काढला.
या घटनेची माहिती दुकान मालक वेदपाठक यांनी तात्काळ विजापूर नाका पोलिसांना कळविल्यानंतर विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादा गायकवाड वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यावेळी दरोडेखोर आले त्यांनी दमदाटी केली व पळून गेले ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा मधून कैद झाली असून याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडेखोरांच्या शोधासाठी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे चार पोलीस पथक तसेच शहर गुन्हे शाखेची तीन पोलीस पथके कामाला लागली असून पोलिसांकडून या गुन्ह्याचा कसोशीने शोध सुरू आहे


















