सोलापूर – राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतीच्या निवडणूका जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार ३ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी निश्चित करण्यात आली.
याशिवाय यापूर्वी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणाविरुध्द दाखल करण्यात आलेल्या दहा हरकतीही विभागीय आयुक्तांकडून फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मतदार नोंदणी अभियान व दुरुस्ती घेण्यात आली. या निवडणुकीसाठी अपेक्षित असलेली मतदार यादीही सोमवारी अंतिम करण्यात आल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
गणाकरिताही आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाविरोधात दहा तक्रारांदारांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकती घेतल्या होत्या. गटात व गणात आरक्षण चुकीच्या पध्दतीने पडले असून त्यात दुरुस्ती होण्यासंदर्भातच्या हरकती यावेळी घेण्यात आले होते. विभागीय आयुक्त यांच्याकडे याप्रकरणी सुनावणी होऊन सोमवारी या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या. त्यामुळे यापूर्वी जिल्हा प्रशासनाने केलेल्या गट व गणाच्या आरक्षणानुसारच निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
















