सोलापूर – पाच सप्टेंबर शिक्षकदिनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील ४५ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येते. त्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून ऑगस्ट महिन्यात पुरस्कारासाठी शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. यावेळी ११ तालुक्यातून ४५ शिक्षकांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले . पुरस्कार प्रस्तावांची उलट तपासणी करून अहवालही तयार करण्यात आला. पण प्रस्तावाची छाननी करून आदर्श शिक्षकांची निवड, वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेला मुहूर्त मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शिक्षकांचा गौरव व सन्मान करण्यासाठी शिक्षणाधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
पाच सप्टेंबरला राज्यशासन, विविध संस्था, संघटनांकडून पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव केला जातो . दर्जेदार शिक्षण व गुणवत्ता वाढीसाठी काम करणार्या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून पुरस्कार देण्यात येते. शिक्षक दिनादिवशी शिक्षकांचा यथोचित सन्मान केल्यास घेतलेल्या कष्टाचे सार्थक होते.
प्राथमिक शिक्षण विभागाने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील सर्व २७०० शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांकडून ३० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले होते. तब्बल ४५ शिक्षकांनी प्रशासनाच्या निकष, अटींनुसार प्रस्ताव तयार करून शिक्षण विभागाकडे दाखल केले आहेत. त्यामधून प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श शिक्षक, शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागलेले प्रत्येक तालुक्यातील एक शिक्षक असे ११ तालुक्यातून एकूण २२ आदर्श शिक्षकांची निवड होईल. तसेच, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले योगदान असणाऱ्या दोन शिक्षकांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.
शिक्षक दिनास दोन महिन्यांचा कालावधी लोटला असून पुरस्कारार्थीची निवड, वितरणाचा विसर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला पडला आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी अनंत चतुर्थी, त्यानंतर रमजानची सुटी, त्यानंतर ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पुरस्कार वितरणासाठी तारीख मिळायची आहे, अशी कारणं शिक्षण विभागातर्फे पुढे करण्यात येत जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतात. गेल्या महिन्यात आहेत. प्रत्यक्षात, पालकमंत्री गोरे सातत्याने जिल्हा परिषदेत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पण, दप्तर दिरंगाईची सवय लागलेल्या प्राथमिक शिक्षण विभागास व शिक्षणाधिकारी यांना कर्मचाऱ्यांना गौरव करण्यासाठी वेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
…
लवकरच पुरस्कार वितरण
…
शिक्षक पुरस्कारांचे प्रस्ताव दाखल आहेत पण मध्यंतरी अतिवृष्टी, महापुरामुळे अनेक शाळांचे मोठे नुकसान झाले होते. परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. लवकरच पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात करण्यात येईल.
कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

















