वैराग – दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणजे बार्शी तालुक्यातील सासुरे हे गाव. येथील जागृत देवस्थान श्री म्हंकाळेश्वर यात्रेस बुधवार, ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री महांकाळेश्वर हे एक दैवत असून ते मूळ देवस्थान उज्जैन येथील आहे. परंतु दयाळराजे या अवतारी पुरुषांच्या भक्तीस पावन होऊन ते सासूरे येथे प्रकट झाले अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे पाच दिवस यात्रा उत्सव भरतो, यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी पहाटे यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला टोपाचा छबीना निघणार आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून रात्री दोन वाजता दुसरा टोपाचा छबीना निघणार आहे. गुरूवार, ६ रोजी सकाळी नऊ वाजता भागवताचार्य हभप संतोष महाराज लहाणे यांची किर्तन सेवा होणार आहे. तर दुपारी चार वाजता सार्वजनिक कुस्तीचा फड होणार आहे. या फडात श्री महांकाळेश्वर केसरी एक लाख इनामाची कुस्ती पैलवान विजय वारा विरूध्द अबु चाऊस यांच्यात लढली जाणार आहे. शुक्रवार ७ रोजी, हभप अॅड. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे किर्तन होणार आहे. शनिवार, ८ रोजी हभप भाऊसाहेब महाराज कदम यांचे किर्तन होणार आहे. , रविवार, ९ रोजी रोजी लळीत साजरी करून यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. यात्रे दरम्यान दररोज छबिना निघणार आहे. तसेच विविध यात्रा कमेटींच्यावतीने दररोज रात्रीमनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत तानाजी आवारे, मोरे यात्रा कमेटी, बाळासाहेब पाटील, महांकाळेश्वर भक्त, विठ्ठल इंगळे, काशिनाथ जाधव यांच्यावतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.
सास ऋुषींच्या नावावरून या गावाला सासुरे हे नाव पडले आहे. येथे नागझरी नदीकाठी श्री महांकाळेश्वराचे पुरातण हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या पन्नास फुट उंच शिखरावर अनेक शिल्पकला कोरल्या आहेत. प्राचीन बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना येथे पाहायला मिळतो. मंदिरात शिवभक्त दयाळराजेंची संजीवन समाधी आहे. तसेच मंदिरात बारा ज्योर्तिलिंगासह अष्ठ भैरवांच्या पिंडी आहेत. मंदिरातच शेषशाही नागनाथाचा फणा आहे. त्याच बरोबर ऐतिहासीक प्रसंगाची साक्ष देणारे अनेक विरगळ येथे पहावयास मिळतात. यात्रेनिमित्त मंदिरावर नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पाच दिवस चालणार्या या यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महांकाळेश्वर देव टस्टच्यावतीने मार्गदर्शक विश्वस्त डॉ. अजयकुमार करंडे, अध्यक्ष सज्जन दळवी यांनी केले आहे.
असे हे वेगळेपण…
अध्यात्माचे अधिष्ठान असलेल्या सासुरे गावात वर्षभरातील दोन महिणे संपूर्ण गाव मांसाहार व्यर्ज करतो. श्रावण आणि कार्तीक माहिण्यात गावातील एकही व्यक्ती मांसाहार करत नाही. यामध्ये मुस्लीम बांधवही श्रध्देने सहभागी होतात हे विशेष. अज्ञातवासात असताना पाच पांडव सासुरेत आले होते, असा उल्लेख ग्रंथात आढळतो. श्री महांकाळेश्वर देव ही १९६५ पासून देवस्थान ट्स्ट अतिशय पारदर्शकपणे काम पहात आहे.

















