कुर्डुवाडी – माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रत्नागिरी येथील हेल्पिंग हॅंड्स या संस्थेमार्फत सुमारे आठ लाख रुपयांची मदत कुर्डुवाडी येथील प्रा डॉ आशिष रजपूत यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात देण्यात आली.
माढयातील आर्या कृषी महाविद्यालय व टेंभूर्णी येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला. यावेळी पूरग्रस्त भागातील सुमारे १४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार आठशे रुपयांची मदत चेक व आॅनलाईन पध्दतीने देण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. आशिष रजपूत यांनी या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त विभागीय पोलिस अधिकारी शिरीष सासणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य वल्लभ वणजू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख कौस्तुभ सावंत यांनी रत्नागिरीमधून हेल्पिंग हॅंड्स संस्थेने उभा केलेल्या मदतीची माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी कमावते झाल्यावर अशाच पद्धतीने गरजवंतांना व नैसर्गिक आपत्तींमधे मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. प्राचार्य महेंद्र कदम यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थी मदतीपासून वंचित राहू नयेत या भावनेतून ही मदत मिळविली असल्याचे सांगितले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त करत रत्नागिरीकरांनी अडचणीच्या वेळी आम्हांला मदत केली असून आम्ही तुमच्या हाकेला जरूर साथ देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माढयाचे किरण चव्हाण यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. नितीन उबाळे यांनी मानले.
या कार्यक्रमास रत्नागिरी येथील सेवानिवृत्त विभागीय पोलिस अधिकारी शिरीष सासणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य वल्लभ वणजू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख कौस्तुभ सावंत, लायन्स क्लब ट्रस्टी प्रमोद खेडेकर, महावितरणचे अधिकारी संजय वैशंपायन, रोटरी क्लब सदस्य जयेश दिवाणी, टेंभूर्णी येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र कदम, डॉ. आशिष रजपूत, आर्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन उबाळे, पत्रकार किरण चव्हाण यांच्यासह पूरग्रस्त भागातील विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


















