सोलापूर – कामगार आयुक्त कार्यालयाच्यावतीने नोंदीत कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या कार्यालयाकडे शहरातील फक्त ३१ घरेलू कामगाराचींच नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यालयाकडे ज्या घरेलू कामगारांनी नोंदणी केली आहे. अशाच, कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार असून शहरातील अन्य घरेलू कामगारांनीही नोंदणी केल्यास शासकीय योजनांचे लाभार्थी होता येणार असल्याची माहिती कामगार आयुक्त नीलेश येलगोंडे यांनी दिली.
सोलापूर हा कामगारांचा शहर आहे. या शहरात नोकरदार वर्गासह कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या शहरातून पुणे व मुंबईसह इतर शहरात नोकरीनिमित्त प्रवास करणार्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. या सर्व कुटुंबांसाठी घरेलू कामगार गरजेचे बनले आहेत. घरेलू कामगारांमुळे या कुटुंबांना आधार मिळत आहे. मात्र या घरेलू कामगारांनी घरकाम करण्याबरोबर शासनाच्या योजनांच्या लाभासाठी कामगार कार्यालयाकडे नोंदणी करणे काळाची गरज बनली आहे.
घरेलू कामगारांच्या दुर्लक्ष व हलगर्जीपणामुळे या कार्यालयाकडे घरेलू कामगारांची झालेली नोंद कमीच आहे. या कार्यालयाकडे ज्यांनी नोंदी केले नाहीत. त्यांना घरेलू कामगार योजनांचा लाभ घेता येणार नाही. सध्या सहा शासकीय योजना कामगारांसाठी राबवली जाते. या योजनेत एखाद्या नोंदीत कामगाराबाबत दुर्दैवी घटना घडल्यास त्यांच्या वारसांना सहाय्यही मिळणार आहे.
…,,
१८ ते ६० वय पूर्ण झालेल्या घरेलू कामगारांना कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करता येते. ओळखपत्र (आधार कार्ड), वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा व ९० दिवस घरेलू कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र. यासह अन्य कागदपत्रावरून घरेलू कामगारांची नोंदणी करता येणार आहे.
….
आर्थिक मदतीचे लाभार्थी
….
नैसर्गिक मृत्यू : वारसांना तीस हजारांची आर्थिक मदत
अपघात सहाय्य : अपघात झाल्यास तत्काळ आर्थिक मदत
वैद्यकीय खर्च : विविध आजारांवरील उपचारासाठी तरतूद
प्रसुती लाभ : महिला कामगारांना प्रसुती काळात आर्थिक लाभ
अंत्यविधी खर्च : कामगारांच्या अंत्यविधीला आर्थिक मदत
घरेलू कामगारांनी या कार्यालयाकडे नोंदणी केल्यास त्यांना नोंदणी कार्ड दिले जाते. या कार्डवरून विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. शहरात ज्या महिला किंवा पुरूष घरेलू कामगार म्हणून काम करीत आहेत. अशा सर्वच कामगारांनी या कार्यालयाकडे नोंदणी करून कल्याणकारी योजनांचे लाभार्थी व्हावेत.
– नीलेश येलगोंडे, कामगार आयुक्त, सोलापूर


















